औरंगाबाद - रेडीरेकनरचे वाढलेले दर कमी केल्याशिवाय स्वस्त, परवडणारी घरे कशी मिळणार, असा प्रश्न करतानाच बांधकाम साहित्य स्वस्त करून इतर आनुषंगिक कर कमी केल्याशिवाय सामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार नाही, असे क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष सी. शेखर रेड्डी यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत सांगितले.
क्रेडाईच्या सर्वसाधारण सभेसाठी आलेले रेड्डी म्हणाले, बँकांच्या व्याजदर कपातीमुळे गृहकर्ज स्वस्त होईल. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी ही संधी आहे. विविध कर व ना हरकत प्रमाणपत्र वितरणात सुसूत्रता आणावी.
सिमेंटदराविरुद्ध आंदोलन
शासनाचे रेडीरेकनर दर, बांधकाम साहित्याची अवाजवी महागाई यामुळे घरांच्या किमती वाढत आहेत. सिमेंटचे दर नियंत्रणात आणणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात १६५ रुपयांना मिळणारी बॅग बांधकाम हंगामात ३३० रुपये होते. राज्यात क्रेडाईच्या ३८ शाखा आहेत. सिमेंट दरवाढीविरुद्ध त्यांनी आठवडाभर काम बंद आदोलन करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
पायाभूत सुविधा
आर्थिक मागासांसाठी घरांची योजना पायाभूत सुविधांमध्ये घेण्यात यावी. ही घरे बांधणा-या विकासकास पायाभूत सुविधांसह करप्रणालीमध्ये विशेष सवलत देण्याची गरज असल्याचे रेड्डी म्हणाले.