आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनापरवानगी बांधकामांवर हातोडा, सात बांधकामांवर मनपाच्या पथकाची कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मनपााने सातारा, देवळाईतील विनापरवानगी बांधकामावर लक्ष केंद्रित केले आहे. तीन दिवसांपासून मनपाच्या अतिक्रमण विभागाने या दोन्ही वॉर्डांत मोहीम सुरू केली असून गुरुवारी देवळाईतील सात विनापरवानगी बांधकामांवर पथकाने हातोडा मारला.
शहराप्रमाणे सातारा आणि देवळाई वॉर्डात अनधिकृत मालमत्तांचा प्रश्न निर्माण होऊ नये, असा मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांचा प्रयत्न आहे. या वॉर्डात विनापरवानगी बांधकाम होऊ नये यासाठी लक्ष देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. दरम्यान, सातारा, देवळाई वॉर्डात अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचे वृत्त "दिव्यमराठी’नेप्रकाशित केले. परवानगी नसताना इमारती उभ्या राहत असल्याचेही वृत्ताद्वारे निदर्शनास आणून दिले होते. त्याची दखल घेत देवळाईच्या मुख्य रस्त्यावरील सात विनापरवानगी बांधकामांवर कारवाई करण्यात आली. पथकाने तेथे उपलब्ध असलेले सर्व बांधकाम साहित्यही जप्त केले. अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी सी. एम. अभंग, इमारत निरीक्षक जे. जी. दौड यांनी कारवाई केली.

साताऱ्यातही मोहीम
मनपाच्या पथकाची मोहीम सुरू राहणार असून देवळाईतील कारवाईनंतर सातारा वॉर्डातील विनापरवानगी, अनधिकृत बांधकामांवरही लवकरच हातोडा उगारला जाणार आहे. कारवाई टाळण्यासाठी बांधकाम करण्यापूर्वी मनपाची परवानगी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

कारवाई सुरूच राहील
^सातारा आणि देवळाईत मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. तत्पूर्वी मनपाची परवानगी घेतली नसेल तर त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल. अशा बांधकामांवर पथकाची नजर असून दोन्ही वॉर्डात यापुढेही मोहीम सुरूच राहील. सी.एम. अभंग, प्रशासकीय अधिकारी, अतिक्रमण हटाव विभाग, मनपा

काम पूर्ण झालेल्या अनधिकृत इमारतींवरही कारवाई
शहरातील निम्म्या वस्त्या गुंठेवारी भागात आहेत. असाच प्रकार या दोन्ही वॉर्डांत होऊ नये यासाठी प्रशासनाकडून काळजी घेण्यात येत आहे. काम पूर्ण झालेल्या अनधिकृत इमारतींवरही लवकरच कारवाई केली जाणार असून सध्या विनापरवानगी बांधकामे राेखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच कारवाईनंतरही शासकीय नियम डावलून केवळ डागडुजी करत इमारती किंवा सदनिका विकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवरही मनपाची नजर आहे.
बातम्या आणखी आहेत...