आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Without Priscription Drug Salers Facing Police Action

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधी विकणार्‍यांवर होणार कठोर कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - प्रिस्क्रिप्शनविना औषधी विकणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येईल, तसेच प्रिस्क्रिप्शन कसे असावे, कुठल्या बाबींचा त्यामध्ये समावेश असावा, त्यात एक सारखेपणा आणता येईल काय, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीद्वारे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती अन्न व सुरक्षा प्रशासनाचे आयुक्त महेश झगडे यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, गेल्या सहा महिन्यांपासून फार्मासिस्ट नसलेल्या विक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे. ही मोहीम सुरूच राहिल. केवळ विक्रेत्यांवरच नव्हे तर, कारवाई करण्यात कुचराई करणार्‍या अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकार्‍यांवरही कारवाई होईल. राज्यातील एका सहआयुक्ताला तसेच एका औषध निरीक्षकालाही निलंबित करण्यात आले आहे. त्याचवेळी राज्यात तीन लाख 85 हजार नवीन परवाने देण्यात आले आहेत. आतापर्यंत राज्यभरात 21 कोटींचा गुटखा व पान मसाला जप्त केल्याचे आयुक्त झगडे म्हणाले.
आरोग्य विभागाच्या सहकार्याने प्रयोगशाळा
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहकार्याने एकत्र प्रयोगशाळा चालवण्याचा विचार सुरू आहे. अन्न विश्लेषक प्रशासनाकडे कमी असल्याने हा विचार पुढे येत आहे. त्यामुळे नमुने तपासणी लवकर होऊ शकेल. त्याचबरोबर प्रशासनाच्या वतीने प्रयोगशाळेसाठीची विविध यंत्रसामग्री व उपकरणेही घेण्यात येत असल्याचे झगडे यांनी सांगितले.
‘टॉप 10 किलर्स’मध्ये चुकीची औषधे
नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार ‘टॉप 10 किलर्स’मध्ये चुकीच्या औषधांचा समावेश आहे. सुमारे 65 टक्के प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स) कारण नसताना दिली जातात, असेही आढळून आले आहे. त्यामुळेच प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे देणार्‍यांवर कठोर कारवाई होईल. विक्रेत्यांचे बिल तपासले जाणार असून योग्य डॉक्टरने योग्य प्रिस्क्रिप्शन दिले आहे का, कॉम्बिनेशनच्या व इतर औषधांचा दुष्परिणाम रुग्णावर होऊ शकतो का, हे तपासण्याची जबाबदारी फार्मासिस्टची आहे. दरम्यान, राज्य सरकारने लक्ष घातल्यामुळे अन्न व औषधी प्रशासनाचे बजेट आठ कोटींवरून 32 कोटींवर गेल्याचेही त्यांनी सांगितले.