आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलक्रांती: ‘वोक्हार्ट’ 20 गावांत प्रत्येकी 1 कोटी लिटर पाणी साठवणार; छोटी-छोटी गावे दत्तक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- वोक्हार्ट फाउंडेशनने औरंगाबाद खुलताबाद तालुक्यातील २० खेडी दत्तक घेतली असून ती जलयुक्त करण्यात येणार आहेत. ही खेडी दोन ते पाच वर्षांत सुजलाम सुफलाम् करून प्रत्येक गावात एक कोटी लिटर पाणी साठवले जाणार आहे. गावातून लुप्त झालेली नदी, ओढे, नाले रुंद खोल करण्याचे काम २०१५ पासून सुरू आहे. दोन वर्षांत खेड्यांची कामे पूर्ण झाली आहेत. 

औरंगाबाद येथील सर्वात जुनी म्हणून ओळखली जाणारी वोक्हार्ट फार्मा कंपनीची वोक्हार्ट फाउंडेशन ही संस्था सामाजिक काम करते. संस्थेचे सीईओ डॉ. हुजैफा खोराकीवाला यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहून २०१५ मध्ये औरंगाबाद आणि खुलताबाद तालुक्यातील छोटी-छोटी २० गावे दत्तक घेतली. यात माळीवाडा, मौसाळा, खेर्डी, सोनखेड, घोडेगाव, रसूलपुरा, गोळेगाव, खांडे पिंपळगाव, विरमगाव, भडजी ही खुलताबाद, तर मांडकी, बकापूर, मोरवाडी, आपदमाळ, सुलतानपूर, दुधाड, भांबर्डा, गाढेजळगाव, नागोणीची वाडी ही औरंगाबाद तालुक्यातील गावे निवडली. या गावातील हरवलेल्या नद्या, नाले आणि ओढे मोठे करणे, आरोग्य, रोजगार, शाैचालये, गुणवत्ता, शेतीपूरक व्यवसाय यावर काम केले जाणार आहे. गेल्या दोन वर्षांत नऊ गावांतील पाणी पातळी वाढवण्यात संस्थेला यश आले आहे. अब्दीमंडी, मौसाळा, खेर्डी, रसूलपुरा, घोडेगाव, विरमगाव, मांडकी, माळीवाडा या गावांतील कामे पूर्ण झाली आहेत. 


मांडकी गावातील पाणी पातळी आली अवघ्या १५ फुटांवर 
औरंगाबादपासून जवळच असणाऱ्या मांडकी गावातील २९ विहिरींचे फेरभरण केल्याने पाणी पातळी पंधरा फुटांवर आली आहे. या गावात वोक्हार्ट शिक्षण, आरोग्यावरही काम करणार असून ते काम प्रगतिपथावर आहे. एका गावात किमान कोटी लिटर पाणी जमिनीत जिरेल अशी यंत्रणा गावागावांत तयार केली जाणार आहे. यासाठी कंपनी ४० लाख रुपये खर्च करणार आहे. 

ही सर्वकामे लोकसहभागातून सुरू असून २० गावे मॉडेल व्हिलेज करण्याची आमची योजना आहे. एका गावात किमान कोटी लिटर पाण्याचे पुनर्भरण व्हावे, अशी रेनवॉटर हार्वेस्टिंगची योजना तयार केली जात आहे. यासह मोफत औषधी, उपचारासाठी मेडिकल व्हॅन दिल्या जात आहेत. 
- डॉ. हुजैफा खोराकीवाला, सीईओ, वोक्हार्ट फाउंडेशन. 
बातम्या आणखी आहेत...