आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman Bank On Municipal Corporation Land Aurangabad

मनपाच्या जागेत होणार महिला बँक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - औरंगाबाद शहरातील पहिल्या राष्ट्रीयीकृत महिला बँकेला रिलायन्स मॉल परिसरातील पालिकेच्या मालकीच्याच जागेत स्थान मिळणार असल्याचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी स्पष्ट केले आहे. येथील गाळे शिवसेनेच्या तीन कार्यकर्त्यांना देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला असला तरी तो फिरवून पाच हजार चौरस फूट जागा महिलांच्या बँकेला दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

येत्या 1 जानेवारीला ही बँक शहरात सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात महिलांची ही बँक सुरू व्हावी यासाठी खैरे यांनी गेल्या काही दिवसांपासून पाठपुरावा चालवला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी या नव्या बँकेच्या अध्यक्षांशी भेट घेऊन चर्चा केली. पहिली महिला राष्ट्रीयीकृत बँक येत्या 19 नोव्हेंबरला मुंबईत सुरू होत असून त्यानंतर औरंगाबाद शहराचा क्रमांक लागावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

महिला बँकेसाठी गारखेडा परिसरात रिलायन्स मॉलच्या बाजूला असलेल्या पालिकेच्या मालकीची जागा देण्याचा मनोदय खैरे यांनी जाहीर केला होता. मात्र ही जागा शिवसेना नगरसेवकांच्या तीन कार्यकर्त्यांना देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मार्च 2013 मध्येच मंजूर केल्याचे समोर आले. त्यामुळे शिवसैनिकांनी खैरे यांच्या प्रस्तावास विरोध चालवला होता. जागा द्यायची असेल तर त्यासाठी निविदा काढण्यात याव्यात, अशीही मागणी जोर धरत होती.

या पार्श्वभूमीवर जागा देण्याचा प्रस्ताव बारगळणार तर नाही ना, अशीही चर्चा सुरू झाली होती. मात्र प्रत्यक्षात ही बँक ठरलेल्याच जागी होईल, असे खैरे यांनी ठामपणे सांगितले.

अनेक प्रस्ताव फिरवतात हाही फिरवला जाईल
सर्वसाधारण सभा किंवा स्थायी समितीने घेतलेले निर्णय याच सभा पुन्हा फिरवतात. हा एक प्रक्रियेचा भाग आहे. त्यामुळे सेना नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या गाळ्यांचा प्रस्ताव रद्द करून तो बँकेला देण्याबाबतचा प्रस्ताव पुन्हा घेण्यात येईल, असे खैरे यांनी स्पष्ट केले आहे. क्रांती चौक ते रेल्वेस्थानक या रस्त्याला तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांचे नाव देण्याचा प्रस्ताव गतवर्षी डिसेंबरमध्ये सर्वसाधारण सभेने मंजूर केला होता. येत्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव रद्द करून या रस्त्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव येऊ घातला आहे. नवीन प्रस्ताव मंजूर झाल्यास पहिला प्रस्ताव आपोआपच रद्द होतो. त्या न्यायानुसार सेना कार्यकर्त्यांना गाळे देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या सभेत पुन्हा रद्द केला जाईल, असे खैरे यांनी म्हटले आहे.