आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही केले, तुम्हीही करू शकता; दारू दुकान बंद करून दिला एकजुटीचा प्रत्यय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डीबी स्टारने ‘बेबंदशाही’ ही वृत्तमालिका प्रसिद्ध करून शहरातील अवैध दारूविक्री, दारू दुकाने आणि एकूणच जागोजागी रस्त्यांवर मद्यपींचा गोंधळ यावर कोरडे ओढले. त्यानंतर पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाने अनेक ठिकाणी कारवाई सुरू केली. दुसरीकडे सिडको एन-3 भागातील एकत्र महिलांनी लढा देऊन त्यांच्या भागातील दारूचे दुकान बंद केले. त्याबद्दल आनंदोत्सव साजरा करतानाच ‘महिलांनो, जागे व्हा..आम्ही करून दाखवले, तुम्हीही हे करू शकता’ असे आवाहनही या महिला मंडळाने शहरातील तमाम जनतेला केले आहे.

दैनंदिन वापरातील वस्तूंची दुकाने असलेला बाजार, कपडा मार्केट आणि समोरच टॉडलर्स मुलांची लहान शाळा असतानाही सिडको एन-3 मध्ये दिवाळीत पवन बिअर बार अँड वाइन शॉपी नावाचे एक दारू विक्रीचे दुकान सुरू झाले. वॉर्डातील सर्वच महिलांनी व नागरिकांनी त्याला विरोध केला. नगरसेवकामार्फत जिल्हाधिकार्‍यांनाही निवेदन दिले. परंतु फायदा झाला नाही. अखेर या लोकांनी डीबी स्टारकडे कैफियत मांडली. चमूने तपास करून 4 डिसेंबर रोजी ‘शाळेजवळच थाटली बिअर शॉपी’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले.

असे हटले दुकान
दुकान नियमानुसार असल्याचा कांगावा मालक करीत होता तसेच सरकारी कर्मचार्‍यांनीही हतबलता दाखवली होती, पण डीबी स्टारच्या वृत्तामुळे महिलांना वेगळेच मानसिक बळ मिळाले व त्यांनी हा प्रश्न सोडवायचाच, असा चंग बांधला. त्यांचा लढा सुरूच होता. सर्व महिलांनी रोज एका घरात महिला मंडळाची बैठक घेण्यास सुरुवात केली. एकूण 500 महिला तयार झाल्या. त्यांनी उत्पादन शुल्क विभागाला व जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन मतदानाची तयारी सुरू केली. याची कुणकुण लागताच बिअर शॉपीच्या मालकाने दुकान बंद करण्याचा निर्णय घेतला अन् महिलांच्या एकजुटीचा अखेर विजय झाला.

डीबी स्टारचे आभार
या संपूर्ण प्रकारणात डीबी स्टारने पाठपुरावा करून आम्हा महिलांमध्ये जागृती निर्माण केली. वृत्त प्रसिद्ध करून या प्रश्नाला वाचा फोडली. डीबी स्टारच्या या वृत्तामुळे आम्हाला आणखी बळ मिळाले आणि त्यामुळेच हे दुकान हटू शकले, अशा प्रतिक्रिया या सर्व महिलांनी व्यक्त केल्या आहेत.

पेढे भरवून व्यक्त केला आनंद
वॉर्डातील दारूचे दुकान बंद होताच सर्व महिला एकत्र आल्या. त्यांनी एकमेकींना पेढा भरवून हा विजय साजरा केला. या वेळी सिडको एन-3 भागातील तमाम पुरुषही महिला मंडळाचे अभिनंदन करण्यासाठी एकत्र जमले होते. त्यांनीही पेढे वाटून आनंद साजरा केला.

एकीचे बळ दाखवून दिले
आम्ही शहरातील तमाम महिलांना एकीचे बळ काय असते हे दाखवून दिले आहे. आम्हा सर्वांनाच डीबी स्टारमुळे बळ मिळाले. असा त्रास असेल तर एकजूट करून तुम्हीही त्यापासून मुक्ती मिळवू शकता.-हिमानी गर्गे

माझे टेन्शन गेले
या बिअर शॉपीसमोरच माझे पार्लर आहे. महिला माझ्याकडे येतात. पण दारूचे दुकान असल्याने मी टेन्शनमध्ये असायचे. आता माझे हे टेन्शन दूर झाले.- स्वप्ना सेठी