आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाडावर कार आदळल्याने महिला ठार; चालक गंभीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने गाडी वडाच्या झाडावर आदळून महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर कारचालक गंभीर जखमी झाला. बुधवारी सकाळी 7.30 च्या सुमारास मिटमिटा परिसरात हायवे नं. 1 वरील ढाब्याजवळ हा अपघात घडला. खमर विनाज बसराबी (45, रा. मुजीब कॉलनी) असे मृत महिलेचे नाव आहे.

भागीदारीमध्ये प्लॉट विक्रीचा व्यवसाय करणार्‍या खमर विनाज आणि जब्बार खान (रा. कटकट गेट) हे दोघे सकाळी मिटमिटा येथे प्लॉट पाहण्यासाठी कारने (एमएच-20-सीएस-7862) गेले होते. प्लॉट पाहून परतत असताना जब्बार खान यांचा कारवरील ताबा सुटला आणि त्यांची भरधाव कार रस्त्यावरील वडाच्या झाडावर आदळली.

या अपघातात खमर विनाज यांच्या कपाळाला जबर मार लागला. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात रक्तस्राव झाला, तर खान यांच्याही डोक्याला आणि छातीला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. अतिरक्तस्राव झाल्याने खमर यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्याचे पाहून ढाब्यावरील नागरिकांसह रहिवाशांनी कारच्या दिशेने धाव घेतली. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर जखमी खान आणि खमर विनाज यांना तत्काळ घाटीत हलवण्यात आले.

या अपघातात कारचेही मोठे नुकसान झाले. खान यांच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून अपघाताची नोंद छावणी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. दरम्यान, मिटमिट्याच्या रस्त्यावर जड वाहनांची वर्दळ वाढल्याने हा रस्ता धोकादायक बनला आहे. दररोज लहान-मोठे अपघात घडतात. येथील रस्त्यावरून दुचाकी चालवणे अत्यंत कठीण बनले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रकाश दांडगे हे करीत आहेत.