आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैलाच्या धडकेने महिलेचा अंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज - उधळलेल्या मोकाट बैलाच्या धडकेत उमा किशोर धुमाळ या पादचारी महिलेचे डोके रस्त्यावर आदळून ती जागीच ठार झाल्याची घटना वाळूज येथील कै. जीवनलाल पाटणी प्रवेशद्वारालगत मंगळवारी (8 ऑक्टोबर) सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

वाळूज गावात मोकाट जनावरे ग्रामस्थांची डोकेदुखी बनली आहेत. ही जनावरे गावालगतच्या शेतमळ्यांमधून पिके फस्त तर करतातच, त्याशिवाय नगर-औरंगाबाद महामार्गावर बसतात. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होऊन अपघाताच्या घटनादेखील घडतात. या जनावरांना हाकलण्याचा प्रयत्न केल्यास ती अंगावर धावून येतात.

अंत्यविधीच्या वेळी तणाव
मृत उमा धुमाळ यांच्या पार्थिवावर बुधवारी (9 ऑक्टोबर) शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष काकासाहेब पाटील चापे यांनी घटनेचा शोक व्यक्त करताना मोकाट जनावरांचा ग्रामपंचायतीने तत्क ाळ बंदोबस्त करण्याची मागणी केली. या संबधी शेतकरी ग्रामपंचायतीकडे नेहमी तक्रारी करतात. मात्र, ग्रामपंचायत प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करते, असा आरोप चापे यांनी केला. त्यावर उपसरपंच खालेद पठाण यांनी ग्रामपंचायतीची बाजू सांभाळत असे आरोप करणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यानंतर वाद वाढत गेला. हा वाद वाढत असतानाच माजी उपसरपंच संजय खोचे, गिरीश गिरी, मुरलीधर पिंपळे यांच्यासह इतरांनी मध्यस्थी करीत ही लोकभावना आहे, ग्रामपंचायत प्रशासनाने ही बाब समजून घ्यावी, असे मत व्यक्त केल्याने तणाव निवळला.

कोंडवाड्याची सुविधा उपलब्ध : ग्रामपंचायत प्रशासनाकडे कोंडवाड्याची सुविधा आहे. मात्र, मोकाट जनावरांविरुद्ध प्रशासन कोणतीही कार्यवाही करतांना दिसत नाही.

अशी घडली घटना
उमा धुमाळ या अविनाश कॉलनीत असलेल्या भवानीमाता मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन घेऊन सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घरी परतत होत्या. त्या कै. जीवनलाल पाटणी प्रवेशद्वाराच्या पुढे गेल्या असता समोरून उधळलेला मोकाट बैल धावत आला. त्याने धुमाळ यांना धडक दिल्याने त्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर आदळल्या. त्यांचे डोके पाठीमागील बाजूने आदळले गेल्यामुळे त्या जागेवरच बेशुद्ध पडल्या. त्यांना खासगी रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. मात्र, तपासानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मोकाट जनावरांची संख्या 55
वाळूज ग्रामस्थांनी सोडलेली ही पाळीव जनावरे आहेत. त्यातील जी दूध देणारी जनावरे आहेत, ती सायंकाळी घरी जातात. तसेच परिसरातील शेतमळ्यात रात्रीच्या वेळी क ोणी नसते. अशा वेळी ही जनावरे उभ्या पिकांची नासाडी करतात. या जनावरांची संख्याही जवळपास 55 च्यावर आहे.

दुर्दैवी घटना आहे
घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. मोकाट जनावरांच्या मालकांवरील कारवाईसंदर्भात ग्रामपंचायत प्रशासन नक्कीच कडक कारवाई करणार आहे. खालेद पठाण, उपसरपंच, वाळूज

मदतीला पोलिस तयार
गणेशोत्सवाच्या काळातही नोटीस बजावून मोकाट जनावरांवर कारवाई करण्यासंदर्भात निर्देश दिले होते. आता महिलेच्या मृत्यूची घटना त्यातूनच झाल्याची बाब क ाही नागरिकांनी निदर्शनास आणून दिली. त्यामुळे पोलिस ठाण्यातर्फे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना पुन्हा एकदा स्मरणपत्र दिले आहे. -अशोक कदम, पोलिस निरीक्षक

रहदारीला अडथळा
मोकाट जनावरांची संख्या मोठी आहे. जनावरे बहुतेक वेळा एकत्रच असतात. त्यामुळे शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक व महिलांची गैरसोय होते. वाहतुकीलाही अडथळा आणतात. त्यामुळे ग्रामपंचायतीने पावले उचलावीत. काकासाहेब चापे, अध्यक्ष, तंटामुक्त समिती