आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Woman Journalist Nila Upadhye,Latest New In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्थकारण बदलल्याने ‘सुपारी’ पत्रकार वाढले- पत्रकार नीला उपाध्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सध्या आर्थिक गणित जुळवण्यासाठी प्रसारमाध्यमे जाहिराती स्वीकारतात. त्यातूनच ब-याचदा तत्त्वांशी तडजोड केली जाते. पेड न्यूज, स्टिंग ऑपरेशनसारखे प्रकार उदयाला आले. पत्रकारिता धर्माला बगल देऊन विशिष्ट एका व्यवस्थेचा, संस्थेचा खब-या म्हणून काम करण्याची वृत्ती वाढली आहे. त्यातूनच तरुण तेजपालसारखे सुपारी पत्रकार पुढे आल्याची खंत 40 वर्षे पत्रकारिता क्षेत्रात योगदान दिलेल्या, विविध पुस्तकांचे लेखन करणा-या पहिल्या पूर्णवेळ महिला पत्रकार नीला उपाध्ये यांनी व्यक्त केली.
एका खासगी कार्यक्रमानिमित्त शहरात आल्या असता त्यांनी ‘दिव्य मराठी’सोबत विविध विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्या म्हणाल्या, आज महिलांना वृत्तपत्र, टीव्हीसारख्या माध्यमातून पत्रकारितेत मोठी संधी मिळत आहे. मात्र त्यावर समाधान न मानता त्यांनी स्वत:ला सिद्ध करावे. या क्षेत्रातील महिलांनी वाचन वाढवावे. नवनवीन विषयांवर लिखाण करावे. आजूबाजूला घडणा-या घटनांचे तर्कशक्ती आणि विवेचनाच्या दृष्टिकोनातून आकलन करावे व अनुभवाच्या आधारे त्याचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.
परंतु दुर्दैवाने असे घडताना दिसत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. ठरावीक बीट व दैनंदिन विषयाच्या चक्रव्यूहात आजच्या बहुतांश महिला पत्रकार अडकल्या आहेत. बदलत्या आव्हानांचा सामना करताना स्वत:च्या स्त्रीत्वाचे भांडवल करण्याऐवजी बौद्धिक पातळीवर त्यांनी स्वत:ची योग्यता सिद्ध करण्याचा सल्ला उपाध्ये यांनी दिला. स्त्रियांमधील इच्छाशक्तीला, क्षमतेला आजही पूर्ण सहकार्य मिळत नाही ही सत्य बाब असल्याचेही त्यांनी सांगितले.

बुद्धिमान लोक पत्रकारितेत येणे काळाची गरज
पत्रकारिता क्षेत्रातील अनेकांची उपाध्ये यांनी कानउघाडणी केली. या क्षेत्रातील प्रशिक्षण देणारी अनेक महाविद्यालये आज सुरू आहेत. विद्यापीठांमधूनही वृत्तपत्र आणि टीव्ही पत्रकारितेचे प्रशिक्षण मोठ्या प्रमाणावर दिले जाते. मात्र या क्षेत्रात करिअर करू इच्छिणा-यांना योग्य दिशा देण्याचे काम या प्रशिक्षण संस्थांमधून दिले जात नाही, ही दुर्दैवाची गोष्ट असल्याचे त्या म्हणाल्या.
ग्लॅमरस फील्ड म्हणून या क्षेत्रात येऊ पाहणा-यांची संख्या खूप असल्याचे सांगत या क्षेत्रात काम करणा-या कित्येकांजवळ वैचारिक बैठक नाही. दुसरे काही जमले नाही म्हणून पत्रकारितेकडे वळणा-या माणसांचा भरणा आहे, असे अनुभवातून आलेले निरीक्षणही त्यांनी नोंदवले. अभ्यासू, बुद्धिमान मंडळींनी या क्षेत्रात येणे ही आजच्या पत्रकारितेची आवश्यकता असल्याची गरज व्यक्त करताना पत्रकारितेच्या माध्यमातून मी समाजाला-देशाला काय देऊ शकलो, हा प्रश्न या क्षेत्रातील प्रत्येकाने स्वत:ला विचारावा, असा सल्लाही त्यांनी दिला.