आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाराशे फुटांवरून तरुणीची विमानातून उडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ‘छत्री माता की जय’ म्हणत तिने डोळे मिटले, श्वास रोखला आणि स्वत:ला साडेबाराशे फूट उंचावरून खाली झोकून दिले. क्षणभर डोळ्यांपुढे अंधार पसरला; पण ती डगमगली नाही. काही कळायच्या आत भलेमोठे पॅराशूट झर्रकन उघडले आणि ती अलगद जमिनीवर उतरली. हे धाडस आहे, औरंगाबादेतील मुस्लिम युवती सनोबर हाश्मीचे. वायुसेनेतर्फे आयोजित राष्ट्रीय पॅराट्रूपिंग कॅम्पमध्ये तिने महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याचा मान मिळवला आहे.

एनसीसीतर्फे दरवर्षी पॅराट्रूपिंग कॅम्पचे आयोजन केले जाते. यंदा महाराष्ट्रातून औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयातील सनोबर वसीम हाश्मी या एकमेव विद्यार्थिनीची यासाठी निवड झाली. ती बीएस्सीच्या दुसर्‍या वर्षाला वडील वसीम परभणीत वाहतूक शाखेत पोलिस निरीक्षक आहेत. त्यांनी सातवीपासून सनोबरला चांगल्या शिक्षणासाठी औरंगाबादेत ठेवले.

अशी झाली निवड
अत्यंत कठीण अशा 4 चाचण्या पार केल्यानंतर एक हजार कॅडेट्समधून 20 जणांची कॅम्पसाठी निवड झाली. या कॅम्पची संपूर्ण जबाबदारी वायुदलाकडे असते. शारीरिक क्षमता, पेशन्स,संभाषण, भाषा तसेच इतर कौशल्य लक्षात घेऊन सनोबरची निवड झाली. यानंतर तिने आग्य्रात 10 दिवसांचे ग्राऊंड ट्रेनिंग घेतले. यात एअर क्राफ्ट आणि पॅराशूटशी संबंधित माहिती देण्यात आली. तसेच 11 दिवसांच्या फॅन टेस्टलाही सामोरे जावे लागले. यात तिला 30 फुटांवरून उडी मारण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. चारही चाचण्यांत चांगले परफॉर्म केल्यानंतर देशभरातून 20 कॅडेट्सची प्रत्यक्ष एअरक्राफ्टमधून उडी मारण्यासाठी निवड करण्यात आली. विशेष म्हणजे यावर्षी यात 20 पैकी 11 मुलींचा समावेश होता.

आरडी परेडमध्ये राज्याचे नेतृत्व - प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत राजपथावर झालेल्या संचलनात देशभरातून 148 कॅडेट्सची निवड झाली होती. यात 15 मुली महाराष्ट्राच्या होत्या. औरंगाबादेतून सनोबर आणि दीपाली र्शीखंडेचा समावेश होता. सनोबरने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पथकाचे संचलन केले. थलसेना कॅम्प तसेच मालवणकर फायरिंग कॅम्पमध्येही तिने राज्याचे प्रतिनिधित्व केले.

आयपीएस अधिकारी व्हायचेच - एनसीसी केल्यानंतर खरे तर लष्करात जाण्याचा मार्ग सुकर होतो; पण मला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन आयपीएस अधिकारी व्हायचे आहे. लष्करी अधिकार्‍यांना र्मयादित प्रशासकीय अधिकार असतात. मला पोलिस अधिकारी होऊन भयमुक्त समाज घडवायचा आहे.’’ हाश्मी सनोबर वसीम, विद्यार्थिनी