आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"त्या' महिलेची ओळख पटली; बहिणीने ओळखला मृतदेह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बीड बायपासवरील ऑरेंज सिटीच्या बाजूला मे रोजी सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाची मंगळवारी ओळख पटली. सीता सुरेश वाघमारे (३३, रा. मोरेगाव, मानवत सेलू) असे तिचे नाव असून बहीण अनिता सुरेश सीताफळे (रा. मोरेगाव) हिने सीताचा मृतदेह ओळखला. बेगमपुरा स्मशानभूमीत तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या महिलेची ओळख पटली असली तरी तिच्या मृत्यूचे गूढ कायम आहे.

पंधरा दिवसांपासून आपली बहीण (सीता) बेपत्ता असल्याने तिचा शोध घेण्यासाठी अनिता शहरात आली होती. सीता औरंगाबादला आली की ती मुकुंदवाडीतील राजनगर येथे दिराकडे जात असे. त्यामुळे अनिता चौकशी करण्यासाठी त्याच्याकडे गेली. मात्र, ती सापडली नसल्याने दोघेही तक्रार देण्यासाठी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गेले. त्या ठिकाणी गुन्हे शाखेचे कर्मचारी त्यांना भेटले. या कर्मचार्‍यांनी अनिताची चौकशी केली असता बीड बायपास येथे खून झालेली महिला ही अनिताची बहीण असू शकते, असे त्यांना वाटले. म्हणून त्यांनी अनिताला घाटीतील शवगृहात ठेवलेला मृतदेह दाखवला. तो आपल्या बहिणीचा असल्याची खात्री पटल्याने तिने हंबरडा फोडला.

गोंदणावरून ओळख पटली : मारेकर्‍यांनीसीताचा चेहरा दारू टाकून जाळल्यामुळे ओळख पटणे कठीण होते. मात्र, उजव्या हातावर कांती, सुरेश, मनोज अशी नावे गोंदलेली होती. कांती हे तिच्या बहिणीचे नाव असून सुरेश नवर्‍याचे आणि मनोज मुलाचे नाव असल्याचे कळले. त्यावरून मृतदेहाची ओळख पटली. पाच दिवसांपासून सातारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, सहायक फौजदार राजेश वाघ, अशोक नरवडे, विलास घनवटे, महेश कोमटवार, मच्छिंद्र सोनवणे, गणेश वागरे यांनी सातार्‍याचा परिसर या महिलेची ओळख पटवण्यासाठी पिंजून काढला होता.

बहिणीनेच दिला अग्नी : सीताचानवरा सहा वर्षांपूर्वी मरण पावला. तिचे सासर वाळूज- पंढरपूर आहे. तिच्या दोन मुली आणि एक मुलगा नातेवाइकांकडे राहतो. सीताला चार भाऊ असून चौघांनीही तिच्याशी नाते ठेवले नाही. चौघेही मसाला विक्रीचा व्यवसाय करतात. तिच्या अंत्यसंस्कारासाठीही ते आले नाहीत. सीता मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत होती. अनेकदा ती भीकही मागायची. पंचशील महिला बचत गटाने अंत्यसंस्काराची व्यवस्था केली. गावाकडील दोघे पोलिस कर्मचारी आणि काही पत्रकारांच्या उपस्थितीत तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बहीण अनिताने पार्थिवाला अग्नी दिला.

खुनाचे रहस्य कायम
ऑरेंजसिटीच्या बाजूला दोन दिवसांपासून सीताचा मृतदेह पडून होता. पुरावा नष्ट करण्यासाठी खुन्यांनी तिचा चेहरा जाळून टाकला होता. गळा आवळून तिचा खून करण्यात आला होता. घटनास्थळी दोन वेगवेगळ्या प्रकारच्या विड्यांची थोटके सापडली. त्यामुळे दोन आरोपी असल्याचा पोलिसांचा संशय आहे. मृतदेहाची ओळख पटल्यामुळे खुन्यांचा शोध लवकर लागेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

(फोटो : खून झालेल्या महिलेला तिच्या बहिणीने अग्नी दिला.)