आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला पोलिसाचा राजीनामा नामंजूर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - तीन सहायक पोलिस आयुक्तांवर लैंगिक शोषणाचा आरोप करणार्‍या निलंबित महिला पोलिस शिपाई अमृता अकोलकर यांनी पाच दिवसांपूर्वी राजीनामा दिला आहे. परंतु, दोन प्रकरणांत त्यांची विभागीय चौकशी सुरू असल्याने राजीनामा स्वीकारला नसल्याचे उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, वरिष्ठ अधिकार्‍यांच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी राजीनाम्यात नमूद केले आहे.

अकोलकर यांनी 23 ऑगस्ट 2012 रोजी तीन सहायक पोलिस आयुक्तांविरुद्ध राज्य महिला आयोगाकडे लैंगिक शोषणाची तक्रार केली होती. सुरुवातीला हे प्रकरण विशाखा समितीकडे सोपवण्यात आले. या वेळी अकोलकर यांचा इन कॅमेरा जबाब नोंदवण्यात आला. या प्रकरणाचा चौकशी अहवाल 9 नोव्हेंबर 2012 रोजी पोलिस महासंचालकांकडे गेला. या चौकशीत तत्कालीन सहायक पोलिस आयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी अकोलकर यांना अश्लील मेसेज पाठवल्याचे सिद्ध झाले होते. त्यामुळे त्यांची रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे बदली झाली, तर 27 डिसेंबर 2012 रोजी पोलिस महासंचालक संजीव दयाल यांच्या आदेशाने भाजीभाकरे यांच्यावर सातारा पोलिस ठाण्यात अश्लील हावभाव, विनयभंग केल्याप्रकरणी (509 कलमान्वये) गुन्हा दाखल झाला. यानंतर 3 जानेवारी 2013 रोजी अकोलकर यांनी सहायक पोलिस आयुक्त नरेश मेघराजानी यांच्या दिशेने बूट भिरकावला होता. त्यानंतर अकोलकर यांना निलंबित करण्यात आले. त्या अधून-मधून बेपत्ता होत असल्याने सध्या त्यांची सातारा पोलिस ठाण्यात हजेरी लावण्यात आली. दरम्यान, आपण वरिष्ठ अधिकार्‍यांच्या जाचाला कंटाळल्याने राजीनामा देत असल्याचे त्यांनी अर्जात नमूद केले आहे.