आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला जिवंत जाळले, पतीस जन्मठेप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा जाळून खून केल्याच्या आरोपाखाली पती शेख जावेद शेख गुलाम रसूल (रा. कुंभेफळ) याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. आर. काकाणी यांनी जन्मठेपेची शिक्षा आणि एक हजार रुपये दंड ठोठावला.

सुरैया आणि शेख जावेद यांचे लग्न मे २०१३ रोजी झाले होते. सुरैयाने माहेरहून कुलर आणि वॉशिंग मशीन आणण्यावरून शेख जावेद तिला शिवीगाळ करत होता. तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीसह सासूही तिचा शारीरिक मानसिक छळ करत होती. २५ फेब्रुवारी २०१४ रोजी रात्री पावणेबारा वाजता शेख जावेद याने सुरैयाचा भाऊ मुजीबसोबत मोबाइलवर संभाषण केले. त्यानंतर तो आपल्या आईसोबत काहीतरी बोलला आणि सोबत आणलेल्या बॉटलमधील डिझेल त्याने सुरैयाच्या अंगावर ओतून तिला पेटवून दिले. सुरैयाचा आरडाओरडा ऐकून भाडेकरूंनी पाणी टाकून तिला विझविले. ती ४९ टक्के भाजली होती. सुरैयाची सासू आणि मामे सासरा अमजद रसूल बेग यांनी तिला घाटीत दाखल केले. सुरैयाने करमाडचे तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक दुर्गादास बारसे आणि विशेष न्याय दंडाधिकारी अशोक नंदागवळी यांच्या समक्ष मृत्युपूर्व जबाब दिला. उपचार सुरू असताना तिचा १६ मार्च २०१४ रोजी मृत्यू झाला. करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

११ जणांची साक्ष
खटल्याच्या सुनावणीच्या वेळी तत्कालीन अतिरिक्त लोकअभियोक्ता राजू पहाडिया आणि विद्यमान अतिरिक्त लोकअभियोक्ता शरद बांगर यांनी एकूण ११ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. रासायनिक विश्लेषक (केमिकल अ‍ॅनालायझर) यांनी जप्त केलेल्या मुद्देमालातील प्रवाही वस्तू डिझेल असल्याचे साक्षीत सांगितले. वरील सर्व बाबींचा विचार करता शेख जावेदविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्यामुळे न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
बातम्या आणखी आहेत...