आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केमिकलच्या स्फोटात महिला ठार, चिकलठाणातील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दोन महिन्यांपूर्वीच देवळाई परिसरातील माऊलीनगर येथील घर सोडून चिकलठाणा परिसरात राहण्यास आलेल्या कुटुंबासाठी राखीपौर्णिमा काळ घेऊन आली. चार वर्षांपूर्वी करत असलेल्या व्यवसायासाठी वापरत असलेल्या केमिकलच्या स्फोटात एक महिला जागीच ठार झाली. ही घटना गुरुवारी सकाळी १० वाजता चिकलठाणा येथील लकी पार्क येथे घडली.
बीड बायपास येथील नवपुते वस्तीत रुद्रके कुटुंब राहते. त्यांचा कुलर, फायबर दरवाजे तयार करण्याचा व्यवसाय होता. घराच्या मागील बाजूसच १२०० स्क्वेअर फुटांमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये भंगार सामान ठेवले होते. यात दरवाजे बनवण्यासाठी वापरण्यात येणारे रेजिन (पॉलिस्टर) या केमिकलचे काही रिकामे डब्बे, वापरात नसलेले कुलर, फायबरच्या दरवाजांचे सामानाचा समावेश होता. गुरुवारी मीराबाई रुद्रके (५५) या शेडमध्ये साफसफाईचे करत होत्या. अडगळीत पडलेले सामान व्यवस्थित ठेवताना अचानक केमिकलच्या कॅनचे झाकण उघडले आणि मोठा स्फोट झाला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. स्फोटाच्या आवाजाने सून, मुलगा, मुलगी आणि शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

सिडको एमआयडीसी ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एस. बी. केदारे, जमादार बी. डी. गिरी, दौलत आरके, ढगे यांनी जखमी महिलेला घाटीत दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. फाेरेन्सिक लॅबच्या पथकातील वैभव देशपांडे, ब्रह्मानंद कांबळे, भास्कर ढोले यांनी कॅनचे तुकडे, वस्तू तसेच मीराबाईंच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठवले. तर तपास सहायक फौजदार मुरलीधर सांगळे करत आहेत.

स्फोटाची दाहकता
यास्फाेटाचा आवाज दोन ते तीन किलोमीटरपर्यंत गेला. कॅनचे तुकडे हवेत उडत परिसरात उडाले. काही तुकडे मीराबाई यांच्या शरीरात घुसल्यामुळे त्यांचे कपडेही जळाले. पत्र्याच्या शेडला तडे जाऊन छिद्रेही पडली.

राखीपौर्णिमा अर्धवटच राहिली
राखीपौर्णिमा असल्याने मीराबाई यांचे पती ज्ञानेश्वर हे मुलगा अविनाशसह सकाळीच दुचाकीवर नेवाशाकडे निघाले होते. साधारण ९.३० ते ९.४५ च्या दरम्यान स्फोट होताच त्यांना कळवण्यात आले. माहिती कळताच रुद्रके यांनी तत्काळ घर गाठले. अचानक घडलेल्या घटनेमुळे त्यांना धक्का बसला.

दोन महिन्यांपूर्वीच आले होते...
नवपुते वस्ती येथे रुद्रके यांनी व्यवसायासाठी १८०० स्क्वेअर फूटचा फ्लाॅट घेतला होता. दोन महिन्यांपूर्वी ते येथे स्थलांतरित झाले होते. या दांपत्याला दोन मुले एक मुलगी आहे. यापैकी मोठ्या मुलाचे लग्न झालेले आहे.

गॅस निर्माण झाल्याने स्फोटाची शक्यता
कॅनमध्ये बऱ्याच दिवसांपासून केमिकल असण्याची शक्यता आहे. केमिकलचे प्रमाण अगदीच कमी असले तरी पूर्वी असलेल्या केमिकलमुळे कॅनमध्ये गॅस निर्माण होतो, असे पोलिस फाेरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर अर्धी भरलेली कॅन असेल तर घर्षनामुळे स्फोटाचा धोका आहे, असे मत विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र प्रा. डाॅ.बलभीम चव्हाण यांनी व्यक्त केले.
बातम्या आणखी आहेत...