आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांसाठी पहिले एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जागृती मंच महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत महिलांसाठी स्वतंत्र रोजगार केंद्राची स्थापना नुकतीच करण्यात आली. याद्वारे महिलांना सहज आणि अत्यंत सोप्या पद्धतीने लवकरात लवकर रोजगार उपलब्ध होणार आहे. अशा पद्धतीचे, केवळ महिलांसाठी असलेले हे औरंगाबादेतील पहिले केंद्र आहे.
संस्थेच्या अध्यक्ष प्रा. भारती भांडेकर यांनी या केंद्र स्थानपेमागील भूमिका तसेच कार्यपद्धती सांगितली. त्या म्हणाल्या की, अनेकदा रोजगार मिळवून देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक केली जाते. म्हणून पूर्णपणे सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा पुरविण्याच्या हेतूने संस्थेने हे केंद्र सुरू केले आहे.
संत एकनाथ नाट्य मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या या केंद्रात 100 रुपये या नाममात्र शुल्कावर कुठल्याही क्षेत्रातील महिलांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी साधारणत: 2 ते 3 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. 12 जानेवारीपासून सुरुवात झालेल्या या केंद्रामध्ये आतापर्यंत 15 रोजगार इच्छुक महिला आणि मुलींनी अर्ज केले आहेत. नाव नोंदणीसाठी महिलांना शिक्षणविषयक सर्व आवश्यक कागदपत्रे, पत्ता, कुटुंबाची माहिती संस्थेकडे द्यावी लागणार आहे.
यामार्फत रोजगारातील महिलांना पूर्णपणे वेगळी सेवा पुरवण्याचा संस्थेचा मानस आहे. दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेदरम्यान येथे नावनोंदणी सुरू राहणार आहे. विशेषत: शहरानजिकच्या औद्योगिक वसाहती, वैद्यकीय सेवा, मॉल, हॉटेल्स, दुकाने तसेच विनाअनुदानित शाळांमध्ये महिलांना नोकरी संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध होईल. महिलांसाठीच्या रोजगार केंद्रांची संकल्पना यशस्वी करण्यासाठी प्रा. हेमलता लखमल, सविता कुलकर्णी, प्रा. विद्या पाटील, अ‍ॅड. अंजली कुलकर्णी, डॉ. अर्चना वैद्य तसेच मंगला पाथ्रीकर कार्यरत आहेत.
साड्यांपासून पायपोस - जुन्या साड्यांपासून पायपुसणे व बस्कर बनवून देण्यात येणार आहेत. टाकाऊपासून टिकाऊ तयार करणे हा उद्देश आहे. यासाठी इच्छुकांनी जुन्या साड्या आणून द्याव्यात.’’ - भारती भांडेकर, संस्थेच्या अध्यक्षा
उत्पादनांना मिळाली बाजारपेठ - बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेच्या कार्यालयातच बचत गटांची उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. 50 बचत गटांनी यासाठी नोंदणी केली आहे. बचत गटांच्या महिलांनाही यातून रोजगार प्राप्त होईल.