आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women Entry In Durga, Temple Women Commission Support Vijaya Rahatkar

महिलांच्या दर्गा, मंदिर प्रवेशाला महिला आयोग पाठिंबा देणार - विजया रहाटकर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - स्त्री-पुरुष समानतेसाठी महिला आयोग कायम पुढाकार घेईल. महिलांच्या मंदिर दर्ग्यातील प्रवेशाला आयोगाचा पाठिंबा असेल. आयोगाकडे तक्रार आल्यास त्याची दखल घेतली जाईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजय रहाटकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

दोन महिन्यांपूर्वी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे रहाटकर यांनी स्वीकारली. त्यानंतर आयोगाच्या दोन बैठका झाल्या. गेल्या अनेक वर्षांपासून महिला आयोगाकडे आलेल्या पाच हजारांपेक्षा अधिक तक्रारी प्रलंबित आहेत. यातील १५०० तक्रारी गंभीर स्वरूपाच्या असून त्यावर लवकर सुनावणी होईल, असे रहाटकर यांनी सांगितले. आतापर्यंत तक्रारींची सुनावणी केवळ मुंबई येथे होत होती. त्यामुळे महिलांना आपली तक्रार प्रत्यक्षपणे आयोगासमोर मांडता येत नव्हती. हे लक्षात घेऊन यापुढे "महिला आयोग आपल्या दारी' हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. राज्यात पाच ठिकाणी यापुढे आयोग तक्रारींची दखल घेऊन सुनावणी करणार आहे. या उपक्रमाची सुरुवात औरंगाबादपासून होणार असून ३० एप्रिल रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी दहा वाजता या प्रक्रियेला सुरुवात होईल. ज्या महिलांना आयोगापुढे तक्रार मांडायची आहे, त्यांनी सकाळी दहा वाजता लेखी स्वरूपात तक्रार आणावी, असे अावाहनही रहाटकर यांनी केले.

कार्यशाळेचे आयोजन
महिलांच्यान्याय्य हक्कांसाठी काम करणाऱ्यांसाठी २९ एप्रिल रोजी महिला राज्य आयोगाकडून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांविषयक कायदे, कायद्यातील बदल, लिंगभेद या विषयावर ही कार्यशाळा होणार अाहे. यात अॅड. गोंधळेकर, डॉ. मोनाली देशपांडे आणि दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात कार्यरत अॅड. अजय मेहता हे मार्गदर्शन करणार आहेत. मौलाना आझाद संशोधन केंद्रात सकाळी दहा वाजता ही कार्यशाळा होणार आहे.