आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला वकील म्हणाल्या, आयुक्तांचा सल्ला योग्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- ‘तरुणींनो, वाईट नजरेने पाहणार्‍यांना तेथेच झापड मारा,’ असा स्पष्ट सल्ला पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी मंगळवारी (15 जानेवारी) एका जाहीर कार्यक्रमात दिला होता. या वक्तव्यावर कायदेतज्ज्ञांनी संमिर्श मते मांडली. कायद्याचे रक्षण करणार्‍यांनीच असे विधान करणे बेजबाबदारपणाचे असल्याचे पुरुष वकिलांनी म्हटले, तर आयुक्तांचे वक्तव्य पूर्णपणे कायद्याला धरून नसले तरी सर्मथनीय असल्याची बाजू महिला वकिलांनी मांडली.

शालेय तसेच महाविद्यालयीन तरुणींवर अत्याचार होण्याचे प्रमाणे वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर संजयकुमार यांनी राष्ट्रीय वाहतूक सप्ताहाच्या समारोपप्रसंगी तरुणींना अत्याचार सहन न करता वाईट नजर ठेवणार्‍यांना धडा शिकवण्याचा सल्ला दिला. याबाबत दै. ‘दिव्य मराठी’ने कायदेतज्ज्ञांची मते जाणून घेतली. काही जणांच्या मते, आयुक्तांचे विधान पूर्णपणे चुकीचे, तर काहींच्या मते हा सल्ला योग्य होता.


कायद्याचे रक्षण करणार्‍या जबाबदार अधिकार्‍याचे वक्तव्य चुकीचे
कायद्यात भादंवि कलम 509 अन्वये अश्लील चाळे, हावभाव करणार्‍यांसाठी एक वर्षाची शिक्षा आणि दंड करण्यात येतो. कायद्याप्रमाणे मुलींवर वाईट नजर ठेवणार्‍यांना मारता येत नाही, तरीसुद्धा सध्याची परिस्थिती पाहता मी या वक्तव्याचे सर्मथन करते. -अँड. माधुरी अदवंत

>मुलींनी बिलकूल घाबरू नये व आत्मविश्वासाने जगावे म्हणून पोलिस आयुक्तांनी हे वक्तव्य केले. कायदा मुलींच्या मदतीला येत नसेल तर मुलींनी झापड मारण्यात काही गैर नाही. मुलींनी किमान एवढे बोल्ड तर व्हायलाच हवे. -अँड. प्रीती डिग्गीकर


>टवाळखोरांना झापड मारणे ही क्रिया विरुद्ध प्रतिक्रिया आहे. स्त्रीला लज्जास्पद वागणूक देणे कायद्याने गुन्हा आहे. आज स्त्रियांच्या बाजूचे कायदे असून न्यायालयात स्त्रीची एकटीची साक्ष ग्राह्य धरली जाते. त्यामुळे पुरुषांनी स्त्रीकडे वाईट नजरेने पाहणे गुन्हा आहे. -अँड. अर्चना गोंधळेकर, सहायक सरकारी अभियोक्ता, उच्च न्यायालय

>‘मुलींनो निर्भीड राहा, अत्याचार सहन करू नका,’ हे म्हणायलाच पाहिजे. मात्र, कायद्याचे रक्षण करणार्‍या एका जबाबदार पोलिस अधिकार्‍याने असे विधान करणे बेजबाबदारपणाचे आणि अनपेक्षित आहे. एका चुकीवर दुसरी चूक केल्याने समस्येचे निराकरण होणार नाही. -अँड. सतीश तळेकर

>कोणी मुलीची छेड काढत असेल तर पोलिसांत तक्रार करून न्यायालयाद्वारे त्याला शिक्षा झाली पाहिजे. कायद्यात पोलिसांना मारण्याचा अधिकार नाही, मग मुलींनी कसे मारायचे? लोकशाही आणि कायद्याच्या या राज्यात आयुक्तांचे हे वक्तव्य चुकीचे आहे. -अँड. एस. एम. पटेल, अध्यक्ष, जिल्हा वकील संघ

>जनतेचे संरक्षणाचे कर्तव्य पार पाडण्याऐवजी व्यासपीठावरून असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. टवाळखोरांना झापड मारल्यावर काही मोठा प्रसंग घडल्यास ठाण्यात तक्रार न घेणारे हेच पोलिस मुलींचे काय संरक्षण करणार? - अँड. के. जी. भोसले