आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेतून दर पाच दिवसांत एक महिला बेपत्ता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस ठाण्यातील अधिकृत आकडेवारीनुसार प्रत्येक पाच दिवसांना एक स्त्री- पुरुष बेपत्ता झाल्याची नोंद आहे. यामध्ये महिलांची संख्या अधिक आहे. मात्र, समाजात बदनामी होऊ नये म्हणून नोंद न करणार्‍यांची आकडेवारी यापेक्षा दुप्पट असू शकते. यासंबंधी गेल्या दीड वर्षात 213 तक्रारी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. एकूण 244 स्त्री-पुरुष या काळात बेपत्ता झाले आहेत. यात सर्वाधिक प्रमाण विवाहित महिलांचे आहे.

अशी झाली सुरुवात
समाजशास्त्रातील तज्ज्ञांच्या मते, वाळूज परिसरातील महिला बेपत्ता होण्याची आर्थिक दुर्बलता, सामाजिक परिस्थिती, वय, अशिक्षितपणा इत्यादी अनेक कारणे आहेत. विविध प्रकारची संस्कृती असलेले लोक एकत्र आल्याने येथे एकमेकांच्या संस्कृतीची देवाण-घेवाण झाली. सर्वाधिक लोकवस्ती बजाजनगर, वडगाव कोल्हाटी, जोगेश्वरी यांसारख्या परिसरात आहे. छोट्या वसाहतीतून इतर कुटुंबीयांसोबत जवळीक निर्माण होत गेल्याने विवाहित महिलांना प्रलोभने देणे, त्यांना फूस लावून पळवणे इत्यादी प्रकार वाढले. आज परिस्थिती अत्यंत विदारक झाली असून महिला बेपत्ता होण्याच्या सर्वाधिक घटना वाळूज परिसरात घडल्या आहेत.

महिला घर सोडून का जातात?
परराज्यातून येणार्‍या कामगारांची संख्या वाळूज परिसरात मोठी आहे. बेरोजगारी वाढल्याने बहुतांश कामगारांना येथे विविध कंपन्यांमध्ये कमी पगाराची नोकरी सहज मिळते. परिणामी कमी पगार, छोटे घर, कामाचा ताण यामुळे काही कामगार आपल्या कुटुंबीयांना (खास करून पत्नीला) भौतिक सुख देण्यास असर्मथ ठरतात. याचा फायदा घेत भौतिक सुखाची प्रलोभने देऊन विवाहित महिलांना किंवा मुलींना घर सोडून पळून जाण्यास पुरुष मंडळी बाध्य करतात. महिलादेखील अशा प्रलोभनांना सहजपणे बळी पडतात.

विभक्त कुटुंब पद्धती जबाबदार
वाळूज परिसरातील सर्वाधिक महिला अशिक्षित असल्याने त्यांच्यात भविष्याचा विचार करण्याची क्षमता नसते. केवळ भौतिक सुख मिळत आहे म्हणून त्या तत्काळ त्याच्या मागे धावतात. शहरात पोट भरण्यासाठी संपूर्ण कुटुंब सोबत घेऊन येणे प्रत्येकाला शक्य नसते. केवळ पती-पत्नी एकत्र राहण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळे विवाहित दांपत्यांमध्ये छोट्या-छोट्या कारणांवरून सतत वाद निर्माण होतात. हा वाद निवळण्याचा प्रयत्न करण्यासाठी घरात ज्येष्ठ मंडळी नसते. परिणामी महिलांचा आत्मसन्मान दुखावतो. हेदेखील पळून जाण्याचे एक कारण आहे.

लैंगिक आकर्षण
अनेक प्रकरणांमध्ये लग्न झालेल्या पुरुष आणि महिलेच्या वयात खूप तफावत असते. त्यामुळे दांपत्यांमध्ये नेहमीच वाद होत असतात. लैंगिक आकर्षण हेदेखील महिला बेपत्ता होण्याचे एक कारण असल्याचे तपासात समोर आले आहे. अशा वेळी अशिक्षित महिलांना मार्गदर्शनाची गरज असते. कुणी तरी आपल्या भावना समजून घ्याव्यात, कुणाकडे तरी मन मोकळे करावे, असे सारखे त्यांना वाटत असते. अशा परिस्थितीत त्यांना योग्य सल्ला देण्याची गरज असते; परंतु तसे लोकही त्यांना भेटत नाहीत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

वाळूज परिसरातील एका कुटुंबातील महिला परपुरुषाबरोबर पळून गेली. या महिलेला 13 महिन्यांचा ऋषिकेश नावाचा मुलगा आहे. विशेष म्हणजे या मुलाच्या हृदयात छिद्र असल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. आज या बाळाला आईची गरज आहे. मात्र, आई पळून गेल्याने ऋषिकेशला त्याचे वडीलच आईप्रमाणे सांभाळतात. यासाठी वडिलांना नोकरीदेखील सोडावी लागली. उदरनिर्वाहासाठी ते पुन्हा आपल्या गावी निघून गेले. सध्या मुलाचा उपचार धूत रुग्णालयात सुरू आहे. शस्त्रक्रियेसाठी एक ते दीड लाख रुपये खर्च येणार असून तो पाच वर्षांचा होईपर्यंत शस्त्रक्रिया करता येणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

आकडे बोलतात
>1350 लहान-मोठे उद्योग वाळूज एमआयडीसी परिसरात आहेत.
>1981 मध्ये वाळूज एमआयडीसी परिसर प्रकाशझोतात आला.
>150000 एवढे लोक वाळूज परिसरात पोट भरण्यासाठी आले आहेत.
> 2011 मध्ये वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात 104 तक्रारी प्राप्त झाल्या.

मुलाला वाचवणे हेच ध्येय
बायको सोडून गेली या दु:खापेक्षा छोट्या ऋषिकेशलाआज आईची जास्त गरज आहे. मी सांभाळ करत आहे, पण आईची कमतरता भरून काढणे शक्य नाही. आता ऋषिकेशवर उपचार करून त्याचा जीव वाचवणे हेच माझे ध्येय आहे. कोणत्याही आईने आपल्या मुलाला असे वार्‍यावर सोडून जाऊ नये.
-ऋषिकेशचे वडील

जनजागृतीची गरज
कुठल्याही भागातील महिला बेपत्ता होण्याची कारणे वेगवेगळी असतात. यामध्ये भौतिक सुखाची प्रचंड इच्छा हे प्रमुख कारण आहे. अशा परिस्थितीत शोषण करणारे लोक संधीची वाटच पाहत असतात. तसे होऊ नये म्हणून त्या परिसराचा अभ्यास होऊन मार्गदर्शन आणि जनजागृतीचे कार्यकम राबवणे गरजेचे आहे.
-प्रा. शुभांगी गव्हाणे, स्त्रीशास्त्र अभ्यासक, डॉ. बा. आं. म. विद्यापीठ

महिलांचे प्रबोधन करतो
वाळूज औद्योगिक वसाहत परिसरातील महिलांचे प्रबोधन करण्याचे काम आम्ही नियमितपणे करतो. यासाठी पोलिसांचे सहकार्यही मिळते. काही महिला पळून गेल्यावर त्यांची पुन्हा घरी येण्याची खूप इच्छा असते. अशा वेळी कुटुंबीयांना समुपदेशनाच्या माध्यमातून एकत्र करण्याचे काम आम्ही करतो. आतापर्यंत आम्ही 35 कुटुंबे एकत्र आणण्याचे काम केले आहे.
-नूतन अडसरे, सदस्य, प्रगती महिला मंडळ, वाळूज

थेट सवाल- किशोर नवले
(पोलिस निरीक्षक, वाळूज एमआयडीसी पोलिस ठाणे)

> पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक महिला बेपत्ता होतात?
होय, बेपत्ता झालेल्या महिलांचा आम्ही युद्धपातळीवर शोध घेऊन त्यांना कुटुंबीयांच्या हवाली करतो. आतापर्यंत 90 टक्के प्रकरणांचा तपास पूर्ण झाला आहे.

> या घटनांवर आपला अंकुश नाही का?
हा निर्णय प्रत्येक कुटुंबातील महिलांनी त्यांच्या स्तरावर घेतलेला असतो.

> यावर आळा घालण्यासाठी तुम्ही काय केले?
पोलिस ठाण्याच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम घेऊन महिलांचे प्रबोधन करतो. याचा खर्चही आम्ही स्वत: करतो. मी रुजू झाल्यापासून असे प्रकार कमी झाले आहेत.

> नेमके कारण काय असू शकते?
स्पष्ट सांगता येणार नाही. हा एखाद्याच्या आयुष्याचा प्रश्न असतो. प्रत्येकाचे विचार आणि गरजा वेगवेगळ्या असतात.