आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women Officers Of Land Record Department Complaint On Harssment

भूमी अभिलेखमधील महिला अधिकार्‍यांची छळाची तक्रार, उपसंचालकाविरूध्‍द गंभीर आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - येथील भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक प्रदीप पाटील यांनी कार्यालयातील महिला अधिकार्‍यांचा मानसिक व शारीरिक छळ केल्याची गंभीर तक्रार राज्य महिला आयोगाकडे करण्यात आली आहे. दरम्यान, पाटील यांना तत्काळ निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी करण्याची मागणीही तक्रारीत करण्यात आली आहे.
राज्य महिला आयोगाच्या सदस्या शोमिता बिश्वास यांच्याकडे उपसंचालक कार्यालयातील दोन महिला अधिकारी व अन्य एक महिला कर्मचार्‍याच्या नावाने पाटील यांच्याबद्दल करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पाटील हे येथील कार्यालयात रुजू झाल्यापासून महिला अधिकारी व कर्मचार्‍यांशी अश्लील भाषेत बोलतात. त्याला विरोध केल्यास बदली करणे, कारवाई करणे किंवा निलंबित करण्याची धमकी देतात.
कार्यालयात चांगले काम करणार्‍या महिला अधिकारी, कर्मचार्‍यांची वरिष्ठ कार्यालयात कामचुकार, अकार्यक्षम म्हणून संभावना करतात. त्यांच्या अधीनस्थ असलेल्या मराठवाडा विभागात जिल्हा किंवा कुठल्याही तालुक्याच्या कार्यालयात तपासणी दौर्‍यावर गेल्यास त्यांच्या पार्टीची (कोंबडी, दारू व अन्य) व्यवस्था करावी लागते. त्यांची व्यवस्था न झाल्यास तेथील कर्मचार्‍यावर कारवाई झालीच समजा. प्रदीप पाटील यांच्या अशा वागण्याने आम्हा महिला अधिकारी, कर्मचार्‍यांना नोकरी करणे मुश्कील झाले आहे. पाटील यांच्याकडून होणारा शारीरिक व मानसिक छळ थांबवण्यात यावा. पाटील यांच्या अशा वर्तणुकीची तक्रार केल्यास वरिष्ठ कार्यालयाकडून (संचालक व जमाबंदी आयुक्त, पुणे) आम्हाला न्याय मिळणार नाही यासाठी आपणाकडे तक्रार करण्यात येत असल्याचेही राज्य महिला आयोगाकडे देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे. प्रदीप पाटील यांना तत्काळ निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही तक्रारीत करण्यात आली आहे.
हा तर रिकामा उद्योग
तक्रार करणार्‍याला काही अडवता येत नाही. चांगले काम करणार्‍याच्या तक्रारी होतच असतात. ज्याला कुणाला समोर येऊन बोलायची हिंमत होत नाही, अशा लोकांनी मुद्दामहून केलेला रिकामा उद्योग आहे. प्रदीप पाटील, उपसंचालक, भूमी अभिलेख