आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women Reservation Issue In Zp Election Aurangabad

सर्वच पक्षप्रमुखांनी निवड प्रक्रियेत महिलांना डावलले!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षणाचे विधेयक पारित करण्यात आले खरे, मात्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवार निवड प्रक्रियेत हे धोरण सपशेल गुंडाळण्यात आले. सोमवारी भाजप, मनसे आणि रिपाइंतर्फे मुलाखती घेण्यात आल्या. त्यात एकाही महिला पदाधिका-याला स्थान देण्यात आले नाही.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने सोमवारी शहरात मनसे, रिपाइं, भाजप या पक्षांतर्फे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसनेही मुलाखतींचे सत्र सुरू केले आहे. काँग्रेसमध्ये हालचाली सुरू आहेत. गुरुवारपासून शिवसेनेच्या मुलाखती आहेत. महिलांना राजकारणात आणण्यासाठी सर्वच पक्ष धडपड करीत असले तरी निर्णयप्रक्रियेत महिलांना डावलले गेल्याचे चित्र आज दिसले. भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी होती. अनेक मान्यवरांचे मतदारसंघ आरक्षित झाल्याने त्यांनी पत्नीला उमेदवारी मिळावी यासाठी शक्ती पणाला लावली आहे. अन्य पक्षांच्या तुलनेत भाजपकडे मुलाखती देणा-यांत महिलांची संख्या जास्त होती. मात्र मुलाखत पॅनलमध्ये प्रदेश उपाध्यक्ष रेखा पाटील यांचाच काय तो समावेश होता. त्यांनीही थोड्याच वेळात काढता पाय घेतला.
मनसेने तुडवला आदेश - मनसेकडे लीला देशमुख (जिल्हाध्यक्ष), मंजू देशमुख (जिल्हा सचिव), अ‍ॅड. नूतन जैस्वाल(जिल्हाध्यक्ष) यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी आहेत. मुलाखत प्रक्रियेत यापैकी कुणालाही सहभागी केले नव्हते. नुकत्याच झालेल्या मेळाव्यात महिलांना निर्णयप्रक्रियेच्या बैठकीत बोलवावे, असा आदेश मनसे महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष शिल्पा सरपोतदार यांनी दिला होता. या आदेशाला हरताळ फासण्यात आला. महिला उमेदवारांनी मुलाखतीला सामोरे जाण्याऐवजी त्यांच्या पतिराजांना पाठवणे पसंत केले. अशीच काही परिस्थिती महायुतीच्या मुलाखतींमध्ये दिसून आली.
संक्रांत असल्याने...- इतर पक्षांच्या तुलनेत आमच्याकडे एक तरी महिला होती. संक्रांतीचे दिवस असल्याने महिला पदाधिकारी आलेल्या नसाव्यात. मुलाखतींची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालणार असल्याने त्यांना उपस्थित राहणे शक्य नव्हते. - अतुल सावे, प्रदेश उपाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष
निरोप मिळाला असता तर! - वास्तविक पाहता मला तुमच्याकडूनच कळले की मनसे उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. प्रोटोकॉलप्रमाणे महिला पदाधिका-यांना बोलावणे गरजेचे आहे. आम्हाला निरोप मिळाला असता तर आम्ही हजर राहिलो असतो. - मंजू देशमुख, जिल्हा सचिव, मनसे महिला आघाडी