आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- पतीशी झालेल्या वादातून रेल्वेगाडीखाली जीव देण्यासाठी गेलेल्या महिलेचा जीव पोलिस आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रसंगावधानाने वाचला. ही घटना बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास देवानगरी रेल्वे रुळाजवळ घडली. महिलेला पोलिस ठाण्यात आणल्यानंतर महिला सुरक्षा समिती आणि पोलिसांनी पती-पत्नीत समेट घडवून आणला.
जवाहर कॉलनीतील अरिहंतनगरात राहणारी संगीता (30, नाव बदलले आहे.) हिचा पती कामकाज करत नाही. तिला 15 वर्षांचा मुलगा असून, तो गुरू तेगबहादूर शाळेत नववीच्या वर्गात शिक्षण घेतो. घरखर्च आणि मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी संगीतावरच आहे.
धुण्या-भांड्याचे काम करून महिन्याकाठी साडेतीन हजार रुपये व सासूच्या निवृत्तीवेतनाचे अडीच हजार रुपये मिळतात. तिचा पती 10 दिवसांपासून बाहेरगावी गेला होता. बुधवारी सकाळी सहा वाजता घरी पोहोचताच त्याने चारित्र्यावर संशय घेत संगीताशी वाद घातला. हा वाद विकोपाला गेल्याने ती रागाच्या भरात देवानगरीतील रेल्वे गेट क्र. 54 वर आत्महत्या करण्यासाठी गेली. रेल्वे रुळावर झोपलेली असताना 16734 क्रमांकाची रामेश्वर-ओखा रेल्वे येत होती.
या वेळी उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या बीट मार्शलने आणि सामाजिक कार्यकर्ते र्शीमंतराव गोर्डे पाटील, सामाजिक ग्रुपचे शिवानंद वाडकर, कय्युम शेख, नेत्रा जोशी, सुशील कांकरिया, स्वराज गोर्डे, अमोल रंधे आणि माजी उपमहापौर प्रकाश निकाळजे यांनी समजूत घालत तिला ठाण्यात आणले. याचदरम्यान गेटमन पांडुरंग थोरात यांनी वॉकी-टॉकीवस्न संदेश दिला. यानंतर संगीता आणि तिच्या पतीला ठाण्यात आणून दोघांमध्ये समेट घडवण्यात आला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.