आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अडचणीच्या प्रसंगीही पोलिस ठाण्यात मदत मागणार नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-गुंडांपासून संरक्षण पाहिजे असेल, तर पोलिसांकडे जाऊन काय फायदा? त्याऐवजी इतरांकडे मदत मागू, असे शहरातील नामवंत महिलांनी सिटी चौक पोलिस ठाण्यात आयोजित विशेष कार्यक्रमात सांगितले. महिला दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ‘कठीण प्रसंगात आपण कोणाची मदत घ्याल?’ असा प्रश्न ‘दिव्य मराठी’ने उपस्थित सर्व महिलांना विचारला. त्याप्रसंगी त्यांनी समाजाच्या रक्षणाची जबाबदारी असणार्‍या पोलिसांवर अविश्वास दाखवला.
महिलांवरील वाढत्या अत्याचारांना आळा घालण्यास पोलिस विभाग सक्षम असल्याचे आजही महिलांना वाटत नाही. त्यामुळे पोलिसांची मदत घेण्याऐवजी एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन मदत मागितली, तर आपल्याला योग्य मदत मिळू शकते, असे महिलांना वाटते. सिटी चौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक नागनाथ कोडे यांनीही त्यांच्या भाषणातून वाढत्या अत्याचारांवर कवितेद्वारे खंत व्यक्त केली. ते म्हणाले,
कोण आता वाचवी हो
भोळ्या त्या द्रौपदीला
कृष्णच आता रोज बसतो
कौरवांच्या बैठकीला..
कोडे म्हणाले, लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी एक असलेल्या शासकीय यंत्रणेवरच नागरिकांचा आता विश्वास उरलेला नाही. घरात तसेच घराबाहेरही महिला असुरक्षित आहेत. निर्भया प्रकरणातून स्त्रीशक्ती एकवटली आणि कायद्यात बदल करण्यास भाग पाडले. स्त्रियांनी स्वत:ची शक्ती ओळखून संघटितपणे लढा देण्याची गरज कोडे यांनी व्यक्त केली. अँड. रेखा लड्डा यांनी विशाखा समितीचे महत्त्व सांगत महिलांवर कामाच्या ठिकाणी होणार्‍या अत्याचारांविरुद्ध लढा देण्याचे आवाहन केले. घरगुती प्रकरणांत महिलांना असलेले हक्क, याविषयीचा कायदा आणि होणारी शिक्षा याबाबत त्यांनी विस्तृत माहिती दिली. योगिता झंवर यांची उपस्थिती होती. नीता चांडक यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. राजाबाजार, दिवाण देवडी, गुलमंडी माहेश्वरी प्रभाग तसेच सिटी चौक ठाणे यांच्या वतीने ठाण्याच्या दुसर्‍या मजल्यावर कार्यक्रम घेण्यात आला.