आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मुझे क्या बेचेगा’ने जागवला अभिमान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- ‘मुलीच्या जन्माचे स्वागत करा’ या विषयावर समाजाच्या प्रत्येक स्तरावर जनजागृती होत असतानाच शुक्रवारी (5 एप्रिलला) संत एकनाथ नाट्यमंदिरात भारतीय ग्रामीण पुनर्रचना संचालित महिला अध्यापक महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सोहळ्यात ‘मुझे क्या बेचेगा रुपय्या’ या स्त्रीजन्माचे महत्त्व विशद करणार्‍या गाण्यावरील नृत्याने उपस्थितांना अंतर्मुख केले.

महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुलींच्या जन्माचे स्वागत करा, शिक्षणाला महत्त्व द्या थीमवरील सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच प्रेक्षकांना दज्रेदार मनोरंजनाची पर्वणीही लाभली. ‘एकदंताय वक्रतुंडाय’ या गणेश वंदनेवर भरतनाट्यमचे पदन्यास सादर करत वर्षा जोशी हिने सोहळ्याची सुरुवात केली. अस्सल मराठी बाजाची ‘खेळताना रंग होळीचा होळीचा, फाटला ग कोना माझ्या चोळीचा’ या ठसकेबाज लावणीवर नृत्य करत विद्यार्थिनींनी कार्यक्रमाला रंगतदार वळण दिले. यानंतर राजस्थानी शैलीतील ‘लम्हे’ चित्रपटात र्शीदेवीची अप्रतिम अदाकारी असलेल्या ‘मोरणी बागामा बोले आधी रात मा’ या गीतावर नृत्य करून विद्यार्थिनींनी कार्यक्रमाला अनोखा साज चढवला. ‘जोगवा’ चित्रपटातील लोकप्रिय ‘ललाटी भंडार’ या नृत्यातून विद्यार्थिनींनी अध्यापक होत असतानाच आपल्या परंपरेची कास दाखवून दिली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘इंग्लिश-विंग्लिश’मधील ‘नवराई माझी लाडाची लाडाची गं’ गाण्यावर तर सभागृहातील प्रेक्षकांनीही ठेका धरला. ‘नटरंग’ चित्रपटात गाजलेल्या ‘अप्सरा आली’तील नृत्य सादर करण्यासाठी नृत्यांगना विद्यार्थिनी मंचावर आली तेव्हा शिट्या वाजवून आणि जल्लोष करीत सर्वांनी तिचे स्वागत केले.

‘निम्बुडा निम्बुडा’ हे समूहनृत्य, ‘रंगिलो म्हारो ढोलना’ या पठडीतील नृत्यांनंतर सोहळ्याने कलाटणी घेतली. अलीकडच्या काळातील ‘डिस्को दिवाने’, ‘सय्यारा ओ सय्यारा’ या नृत्यांनीही धमाल उडवली. मुकाभिनय, आम्ही नाही जा, कोंबडी पळाली या दज्रेदार कार्यक्रमांची पर्वणी उपस्थितांना मिळाली.

फॅशन शो ने झाला सोहळयाचा समारोप
शेवटी झालेल्या फॅशन शोने सोहळा संस्मरणीय झाला. वर्षा शिरसाट आणि दीपाली निंबाळकर या विद्यार्थिनींनी सूत्रसंचालनाद्वारे कार्यक्रम सुरेलरीत्या गुंफला. आशा प्रधान हिने आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी लता सूर्यवंशी, नीलिमा देशमुख, मंगल घोरपडे, उषा परघणे, सविता शिरपूरकर, शोभा बिरंजे आणि संगणक विभागाचे संतोष जाधव यांनी पर्शिम घेतले. सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी बी. बी. चव्हाण, अनिल साबळे, विष्णू गाडेकर, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जे. के. जाधव, प्राचार्य राजाभाऊ टेकाळे आणि लेखिका माया महाजन यांची उपस्थिती होती.

मराठी साहित्यसुमनचे प्रकाशन
कविवर्य कुसुमाग्रज यांची नुकतीच 27 फेब्रुवारीला जयंती झाली. हाच धागा पकडत महाविद्यालयाच्या प्राध्यापिका नीलिमा देशमुख यांनी 20 विद्यार्थिनींना सोबत घेऊन मराठी विषयातील रंजक आणि अर्थपूर्ण माहिती असलेल्या ‘मराठी साहित्यसुमन’चे प्रकाशन केले. सुमारे दोनशे पाने असलेल्या पुस्तकातील संपूर्ण मजकूर आणि त्याच्या सजावटीचे काम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी केले. यातील माहिती येणार्‍या काळातील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचा अभिप्रायही प्रकाशनानंतर सर्व मान्यवरांनी दिला.