आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूबंदीसाठी रणरागिणींचा 36 तास पहारा, दुकानदारांनी दिल्या महिलांकडे चाव्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपळगाव रेणुकाई - भाेकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील महिलांनी दारूबंदीविरोधात पुकारलेल्या अांदाेलनाला अवघ्या ३६ तासांमध्येच यश अाले. महिलांनी गावातील दाेन दारू दुकानांबाहेर रात्रभर मुक्काम केल्याने या दाेन दुकानाच्या मालकांनी शरणागती पत्करत दुकानाच्या चाव्याच या महिलांच्या हाती साेपवल्या.  


वर्षभरापासून सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाने दारू दुकानांविरोधात काेणतीच कारवाई न केल्याने गुरुवारी गावातील महिलांनी अाक्रमक भूमिका घेतली हाेती.  मद्याचा साठा घेऊन गावात अालेला ट्रक त्यांनी राेखला. यानंतर या महिलांनी रात्रभर देशी दारूच्या दुकानाबाहेर ठिय्या केला. अापल्या मुलाबाळांसह महिला या अांदाेलनात सहभागी झाल्या हाेत्या.  शुक्रवारी परिसरातील इतर गावातील महिलांनीही अांदाेलनात उडी घेत या महिलांना पाठींबा दिल्याने अांदाेलनाची व्याप्ती अाणखी वाढली अाहे. शुक्रवारी सायंकाळी भोकरदन तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांनी गावात येऊन महिलांशी चर्चा केली. 

 

आंदोलन मागे घेण्याची विनंती

गावातील जवळपास दोनशे महिलांनी गुरुवारी रात्रभर दुकानासमोर पहारा दिला. थंडी असल्याने महिलांनी शेकोटी पेटवली व भजने म्हणत त्यांनी रात्र जागून काढली. तत्पूर्वी गुरुवारी सायंकाळी पारध पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुदाम भागवत यांनी महिलांची समजूत काढून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.  


चाव्या महिलांच्या हाती 
महिलांचा निर्धार आणि आक्रमकपणा पाहून गावातील दोन्ही देशी दारू विक्रेत्यांनी दुकानांच्या चाव्या महिलांकडे सुपूर्द केल्या. गावात ३० वर्षांपासून मी परवाना घेऊन दुकान चालवतो आहे. मात्र आता जनभावनेचा आदर करतो असे एका विक्रेत्याने दिव्य मराठी शी बोलताना सांगीतले. दुसरीकडे  अन्य दोन दुकाने मात्र सुरू होती, तर देशी दारूची दुकाने बंद असल्याने तळीरामांची मात्र चांगलीच गैरसोय झाली.

 

तीन महिन्यांची मुदत

शुक्रवारी सायंकाळी नायब तहसीलदार डी.एस.सोनवणे यांनी पिंपळगाव येथे येऊन महिलांशी चर्चा केली. या वेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांडे प्रस्ताव पाठवण्यात येईल, असे सांगितले. तर महिलांनी गावातील दारू दुकाने स्थलांतरित करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात येत असल्याचे सांगितले व आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.

 

 

मतदानाने दारूबंदी करता येईल 
कायद्यानुसार महिलांचे मतदान घेऊनच अधिकृत दारू दुकान बंद करता येते. त्यासाठी गावाने दारूबंदीचा ठराव घेऊन प्रशासनाकडे पाठवावा. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गावात महिलांचे मतदान घेण्यात येईल. त्यात मतदान यादीत नाव असलेल्या महिला सहभागी होऊ शकतील. रोहिलागड गावात २६ ऑक्टोबर २०१७ रोजी मतदान प्रक्रियेद्वारे महिलांनी दारू दुकान बंद केले होते.  
- शिवाजी जोंधळे,जिल्हाधिकारी,जालना.

बातम्या आणखी आहेत...