आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छेडछाड, अश्लील मेसेजला कंटाळून तिने झोपेच्या गोळ्या खाऊन संपवली जीवनयात्रा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - छेडछाडीला कंटाळून बालाजीनगरातील एका तरुणीने आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच सिडकोच्या बजरंग चौकातील आणखी एका तरुणीने अशाच प्रकाराला कंटाळून आत्महत्या केल्यामुळे औरंगाबादेतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तरुणाने दिलेली जिवे मारण्याची धमकी,छेडछाड व अश्लील मेसेजला कंटाळून श्रुती अशोक कुलकर्णी (रा. एन ७, बजरंग चौक ) या २२ वर्षीय तरुणीने झोपेच्या २० गोळ्या खाऊन बुधवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. उपाचारादरम्यान गुरुवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा तिच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या स्वप्निल मणियारला अहमदनगर येथे अटक केली. सिडको पोलिस ठाण्याचे पोलिस हेडकॉन्स्टेबल हवाळे यांनी सांगितले की, आरोपी स्वप्नील संतोष मणियार (२३ रा. तुर्काबाद खरडी ता. गंगापूर) दोन वर्षापापूर्वी श्रृतीसोबत आयटीआय मध्ये शिकत होता. श्रृतीने आयटीआयचा प्रवेश रद्द करुन दुसऱ्या महाविद्यालयात शिक्षण घेतले. जुन्या ओळखीमुळे स्वप्नीलने श्रृतीकडे लग्नाचा तगादा लावला होता. लग्न न केल्यास तुझ्या कुटूंबाचे बरे वाईट करेन अशा धमक्या दिल्या. या प्रकरणी श्रृतीच्या कुटुंबियांनी स्वप्नीलच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात २७ जुलै राेजी तक्रार दिली. त्यानंतर स्वप्नीलला अटक झाली. सुटकेनंतर त्याने पुन्हा श्रृतीला त्रास द्यायला सुरुवात केली. त्यामुळे श्रृतीच्या कुटुंबियांनी १७ ऑगस्ट रोजी पुन्हा पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी स्वप्नीलला पुन्हा अटक केली. बुधवारी त्याला जामीन मिळाला होता. दरम्यान, या त्रासाला कंटाळून बुधवारी श्रृतीने झोपेच्या जवळपास २० गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तत्पूर्वी तिने आईच्या नावे ‘मला माफ कर...’ अशी चिठ्ठी लिहून ठेवली होती. उपचारादरम्यान गुरुवारी तिचा मृत्यू झाला. श्रुतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी स्वप्नीलच्या विरोधात भादंविच्या कलम ३०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून अश्लील भाषा
सिडको पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक हरीश खटावकर यांनी तक्रार देण्यासाठी गेलेल्या श्रुतीला अश्लील शब्दांत सुनावले होते. तुझ्या आईला तुझ्या वडिलांनी सोडून दिले होते, तुम्ही दोघी बहिणी पण तशाच असणार. उगाच तक्रारीच्या भानगडीत पडू नका असे सुनावले हाेते, असा आरोप मृत तरुणीची बहीण श्रद्धा व मामा तानाजी गाड यांनी केला आहे.