आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिव्ह ऑफ अन‌् पगारवाढीसाठी कामगारांची उपाध्यक्षांना मारहाण, महेश साखर कारखान्यावरील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव- दोन महिन्यांची लिव्ह ऑफ, पगारवाढीसाठी कामगारांनी उपाध्यक्षांच्या केबिनमध्ये घुसून मारहाण केल्याची घटना माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील जय महेश साखर कारखान्यावर गुरुवारी दुपारी एक वाजता घडली. या हाणामारीत कारखान्याचे उपाध्यक्ष, कर्मचारी, कामगार, कामगार युनियनचे सचिव असे सहा जण जखमी झाले आहेत. दरम्यान, कारखान्यावर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 

तालुक्यातील पवारवाडी येथील एनएसएल ग्रुपच्या जय महेश साखर कारखान्यात प्रशासन विरुद्ध कामगार असा वाद सुरू आहे. मागील वर्षी दुष्काळाचे कारण पुढे करत उसाचे गाळप कमी झाल्याने साखर कारखाना प्रशासनाने ४१८ कामगारांना काम करत ४६ दिवसांचा लिव्ह ऑफ दिला होता. प्रत्येकी वर्षी दिली जाणारी २०७८ रुपयांची पगारवाढही रद्द केली होती. त्यामुळे जय दुर्गा कामगार संघाने उपोषण करत आवाज उठवला होता. शेवटी युनियन आणि कारखाना प्रशासनात तडजोड होऊन कामगारांनी पगारवाढीसह ४६ दिवसांच्या लिव्ह ऑफवर सहमती दर्शवली होती. 

यंदा कारखाना प्रशासनाने कामगारांना फेब्रुवारी ते ३१ ऑगस्ट असे सात महिने लिव्ह ऑफ देण्यासाठी कामगार आयुक्तांकडे प्रकरण दाखल केले होते. दरम्यान, गुरुवारी याप्रकरणी नोटीस लावण्यात आली होती. हे पाहून कामगार युनियनच्या काही पदाधिकाऱ्यांसह कामगार कारखान्याचे उपाध्यक्ष एस. राधाकृष्ण यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांच्या केबिनमध्ये गेले होते. चर्चा करत असताना शाब्दिक चकमक होऊन हाणामारी झाली. कामगारांनी उपाध्यक्ष एस. राधाकृष्ण यांना हेल्मेटने मारहाण केली. उपाध्यक्षावर झालेला हल्ला पाहून सुरक्षा रक्षकासह काही कर्मचाऱ्यांनी कारखान्याच्या कामगारांना मारहाण केली. यात कामगार युनियनचे सचिव उद्धव बोचरे यांना पोटात मुका मार लागला असून त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठवण्यात आले. उपाध्यक्ष एस. राधाकृष्ण यांना शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
 
त्यांनीच आम्हाला मारहाण केली 
माझ्याकडे चर्चाकरण्यासाठी आलेल्या कामगारांनी केबिनमध्ये येऊन थेट मला मारहाण करण्यास सुरुवात केली. मी कारखान्याच्या नियमाप्रमाणे त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी एेकले नाही. 
- एस.राधाकृष्ण, उपाध्यक्ष, जय महेश कारखाना. 

समजावून सांगण्याचा प्रयत्न केला
आमच्या हक्काच्या मागण्या आम्ही कारखाना प्रशासनाकडे मागत असून प्रशासन मात्र वारंवार आमच्यावर अन्याय करीत आहे. मागील वर्षी आम्हाला पगारवाढ करता अधिकाऱ्यांना मात्र आगाऊ वेतनवाढ दिली होती. यंदा आमच्यावर होत असलेल्या अन्यायाचा जाब विचारण्यासाठीच आम्ही गेलो असता त्यांनीच अरेरावीची भाषा करून आम्हाला मारहाण करण्यास सुरुवात केली होती. 
- सुनीलशेजूळ, अध्यक्ष, जय दुर्गा कामगार संघ ,पवारवाडी. 

कारखान्यावर पोलिस तळ ठोकून 
जय महेश साखर कारखान्यावर कामगार उपाध्यक्षात झालेल्या हाणामारीची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पोलिस ठाण्याचे कर्मचारी कारखान्यावर पोहोचले. सध्या पोलिस तळ ठोकून असून या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. 
बातम्या आणखी आहेत...