आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुशल मनुष्यबळासाठी शिक्षणाचा पाया बदलावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - उद्योगातील कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी मराठवाड्यातील शिक्षणाचा भुसभुशीत झालेला पाया भक्कम करण्याची गरज उद्योजकांनी व्यक्त केली.

नवनवीन उद्योग येत आहेत. डीएमआयसी प्रकल्पही लवकरच होईल. पण कुशल कामगारवर्ग मिळत नसल्याने उद्योगांसमोरील अडचणी वाढत आहेत. अनेकदा कुशल मनुष्यबळाअभावी जागा रिक्त राहत असल्याची तक्रार उद्योजक करतात. त्यामुळे उद्योगांना पूरक अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात यावी, अशी त्यांची अपेक्षा आहे.

शहरात तीन शासकीय आणि चार खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. त्यात 30 अभ्यासक्रम शिकवले जातात. त्यात फिटर, टर्नर, वेल्डर, टूल अँड डायमेकर, मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक आदी 30 अभ्यासक्रमांचा समावेश होतो. सेंटर ऑफ एक्सलन्स सारखा 6 ट्रेडचा अभ्यासक्रमदेखील सुरू करण्यात आला आहे.

संस्था, कारखानदारांनी एकत्र येण्याची गरज
कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी कंपनी आणि औद्योगिक संस्थांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे. कारखान्यांनी स्वत:चे ट्रेनिंग सेंटर उभारणे आणि कंपनीला हवे तसे कामगार घडवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे जाणकारांना वाटते. कंपनीमधील मशिनरी अद्ययावत असतात. मात्र, आयटीआयमध्ये तशा मशिनरी नसतात. त्यामुळे संस्थांना मशिनरी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. शिवाय विदेशात ज्याप्रमाणे कारखानदार संस्थांना मशिनरी आणि शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात त्याप्रमाणे येथेही हा पायंडा पडायला हवा. सुभाष गोसावी, प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था.

कौशल्य विकासाची सध्या नितांत गरज आहे. उद्योगाला लागणारे कौशल्य आणि संस्थेमधून बाहेर पडलेले विद्यार्थी यांच्यात तफावत आहे. संस्थेमधील मशिनरी आणि कंपन्यांतील मशिनरी यात खूप मोठे अंतर आहे. वेल्डिंग प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेला विद्यार्थी आणि सध्याचे वेल्डिंग रॉडचे तंत्र पूर्णपणे बदललेले आहे. त्यामुळे उद्योगासाठी लागणारे अभ्यासक्रम बनवण्याची गरज आहे. मिलिंद कंक, अध्यक्ष, सीएमआय.

सीआयआयच्या माध्यमातून फिनिशिंग स्कूलवर जोर देण्याचा प्रयत्न सुरू आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. शिवाय विद्यार्थ्यांचे इंग्रजी सुधारण्याचा प्रयत्न तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षणदेखील त्यांना देण्यात येणार आहे. यामध्ये विशेषत: आयटीआयच्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केले आहे. सीआयआय यावर सध्या काम करत आहे. ऋषी बागला, विभागीय अध्यक्ष, सीआयआय.