आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागरूक नागरिकांच्या प्रयत्नांनी वाचले प्राण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आंबेडकरनगरपरिसरातील आरतीनगरमध्ये अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचा शॉक बसल्याने एक वानर जखमी झाले. त्यानंतर ते गल्लीतच बसून होते. कुत्र्यापासून त्याचा जीव वाचवण्यासाठी गल्लीतील लोकांनी पाच तास आपली सगळी कामे सोडून त्याच्यावर पाळत ठेवली. वन विभागाला बोलावण्यात आले. पथकाने त्याला खडकेश्वर पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. जागरूक नागरिकांमुळे वन विभाग वानराचे प्राण वाचवू शकले.
वृक्षतोड, पाण्याचा अभाव यामुळे वन्य प्राणी मानवी वसाहतींकडे वळत आहे. असाच प्रकार सोमवारी आरतीनगर परिसरात घडला. एक वानर छतावर उड्या मारत असताना अकरा केव्हीच्या हायटेन्शन तारांचा धक्का लागून गंभीर जखमी झाले. या विद्युत झटक्याच्या अपघाताने त्याला धक्का बसला. हा प्रकार पाहताच गल्लीतील नागरिक त्याच्याजवळ गेले. कुत्र्यांचा धोका ओळखून लोकांनी त्याच्यावर पाळत ठेवली. त्यातील विशाल पगारे नामक तरुणाने जस्टडायल या क्रमांकावर संपर्क करून वन विभागाचा क्रमांक मिळवला. तो क्रमांक मुख्य वनसंरक्षक कार्यालयाला लागला. तेथील अनुरेखक पदावर कार्यरत असलेले मारुती सूर्यवंशी यांनी तत्काळ वानर जखमी झाल्याची घटना वनपरिक्षेत्र अधिकारी आर. ए. नागापूरकर यांना कळवली. नागापूरकर यांनी क्षेत्रीय अधिकारी एन. एम. जाधव यांना जखमी वानराला ताब्यात घेऊन वैद्यकीय उपचार करण्याचे आदेश दिले.
जाधव यांनी वनसंरक्षक ए. डी. तांगड, वनमजूर दयानंद आरसूड यांच्यासह घटनास्थळ गाठले. दूरचे अंतर असल्याने त्यांना उशीर लागला. तेवढ्यात वानर शुद्धीवर आले. गोंधळलेल्या वानराने जखमी अवस्थेत पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते जागचे हलूच शकले नाही. त्यानंतर वन विभागाच्या पथकाने चारचाकी वाहन आणले आणि त्याला खडकेश्वर पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर त्याला वन विभागाच्या आवारातील पिंजऱ्यात ठेवण्यात आले आहे.
*ग्रामीण भागाप्रमाणे वन्यजीव सुरक्षा समित्या स्थापन कराव्यात. अशा समित्यांमार्फत शहरातील वन्यजीवांचे संरक्षण करण्यात यावे. शासनाने याकडे लक्ष द्यावे. औचितरावजाधव, नागरिक

*जंगलातमोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे. डाेंगर पोखरताना होणाऱ्या क्रेन, क्रेशरच्या आवाजाने वन्यजीव वसाहतींत शिरतात. शासनाने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी धोरण आखले पाहिजे.
कदिरपटेल, नागरिक
* वनपाल, ३२ वनसंरक्षक आणि १०६ वनपाल आहेत. क्षेत्राच्या मानाने कर्मचारी कमी आहेत. अशा घटना घडल्याने जंगलातून येण्यासाठी उशीर होतो. शिवाय वाहन, जाळ्या, पिंजरा नसल्याने आमच्याच सुरक्षेचा प्रश्न आहे. यासाठी विभागाने स्वतंत्र पथक स्थापन केल्यास जंगलाची सुरक्षा चांगली होईल. एन.एम.जाधव,वनपाल

*शहरातील उपद्रवी अथवा जखमी झालेल्या वानरांना पकडण्यासाठी स्वतंत्र पथक, वाहन प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव आम्ही शासनाला पाठवला होता. मात्र, शासनाने त्याला मान्यता दिली नाही. अनुदानाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्याकडून आम्ही अशा वानरांना पकडून घेतो. अजितभोसले, उपवनसंरक्षक