आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुप्फुसाचे वर्किंग मॉडेल पाहून दिव्यांग मुलांचे केले कौतूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद: रंगीबेरंगी चकती फिरताच त्यातील रंग गायब होतात, चकती थांबली की रंग परततात. न्यूटन डिस्कमधील रंगांच्या खेळामागील हे विज्ञान विशेष मुलांनी अचूक समजून घेतले. एवढेच नव्हे, तर विशेष मुलांनी रंगीत पट्ट्यांच्या चकत्या तर दिव्यांग मुलांनी फुप्फुसाचे वर्किंग मॉडेल तयार केले. मराठी विज्ञान परिषदेच्या या कार्यशाळेत विज्ञानाचे प्रयोग पाहून विशेष मुले थक्क झाली. 
 
केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने दरवर्षी एक थीम घेऊन २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. महाराष्ट्रात मराठी विज्ञान परिषद या थीमवर राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करते. 
 
यास नवी दिल्लीतील तंत्रज्ञान परिषद आणि महाराष्ट्र शासनाचे राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे सहकार्य मिळते. यंदा विज्ञान दिनासाठी दिव्यांगासाठी विज्ञान ही संकल्पना ठेवण्यात आली आहे. यात शारीरिकदृष्ट्या दिव्यांग, गतिमंद आणि अंधांसाठी विज्ञान असे उपविषय आहेत. मराठी विज्ञान परिषदेच्या औरंगाबाद विभागाने दोन शाळांमध्ये या संकल्पनेवर सोमवारी कार्यशाळांचे आयाेजन केले होते. 
 
न्यूटनडिस्कचे प्रात्यक्षिक 
विज्ञानपरिषदेच्या कार्यशाळेत सुरुवातीला पाॅवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे विषय समजावून सांगण्यात आला. यानंतर मुलांच्या मनातील शंकांचे समाधान करण्यात आले. यावर माॅडेल तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले. चिकलठाणा एमआयडीसीतील नवजीवन मतिमंद विद्यालयात विद्यार्थ्यांनी न्यूटनची फिरती चकती तयार केली. 
 
एका सीडीवर पांढरा कागद चिकटवला. स्केचपेनने त्यावर सप्तरंग काढले. काहींनी रंगीत कागद चिकटवले. मधोमध एक गोटी चिकटवली. ती फिरवताच डिस्क फिरते. यावरील रंग गायब होतात. ते पाहून मुले भारावली. यामागील विज्ञान त्यांना उमगले. 
 
हडकोतील भारत विद्यालयातील दिव्यांग मुलांनी फुप्फुसाचे मॉडेल तयार केले. एक बाटली मधोमध कापून त्याखाली एक फुगा लावला. दुसरा फुगा स्ट्रॉ लावून आत सोडला. नंतर मातीने झाकण बंद केले. खालचा फुगा ”अाेढताच बाटलीच्या आतील फुगा फुगतो. नेमके याच पद्धतीने फुप्फुसाचे काम चालते. या कृतीतून काय शिकलो हे मुलांनी लिहून दाखवले. नंतर प्रेझेंटेशन दिले. विज्ञानातील दोन महत्त्वाच्या संकल्पना मुलांना सहज समजल्या. 

ही थिंक क्रिएटिव्हिटी 
- विशेष मुलांमधील विचार करण्याची क्षमता संपलेली नाही. ते खूप चांगले विचार करू शकतात. त्यांच्या हातात खूप चांगले कौशल्य आहे. शारीरिकदृष्ट्या दिव्यांगाकडेही असामान्य क्रिएटिव्हिटी आहे. या मुलांना क्राफ्टच्या वस्तू तयार करण्यास शिकवले जाते. आमच्या कार्यशाळा त्या पुढे जात थिंक क्राफ्ट प्रकारातल्या ठरल्या. मुलांची क्रिएटिव्हिटीची धडपड थक्क करून गेली.
- डॉ.रंजन गर्गे, अध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद, औरंगाबाद चॅप्टर.