आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Environment Day, 142 Free To Live At Dr.babasaheb Ambedkar Marathwada University

पर्यावरण दिन विशेष: घरून पाणी आणून धावपटूंनी जगवली 142 झाडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- रखरखत्या उन्हाचा तडाखा आणि पाणीटंचाईने यंदा सबंध मराठवाडा होरपळून निघाला. दुष्काळग्रस्त लोकांसह पशुधनाच्या मदतीसाठी शेकडो हात पुढे आले; परंतु अनेक भागांत पाण्याअभावी झाडे वाचू शकली नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरातही पाण्याचे स्रोत आटले, विहिरी कोरड्या पडल्या. यामुळे क्रीडा विभागाच्या मैदानावर विशेष प्रयत्नांतून लावण्यात आलेली झाडे करपू लागली. हे गांभीर्य ओळखून राष्टÑीय पातळीवर प्रतिनिधित्व केलेल्या 75 धावपटूंनी अभिनव उपक्रम हाती घेत 142 झाडांना नवसंजीवनी दिली आहे.

यांनी घेतला पुढाकार : झाडांच्या संगोपनात क्रीडा विभाग संचालक डॉ. दयानंद भक्त, विभागप्रमुख डॉ.एस.जे.चंद्रशेखर, प्रशिक्षक मसूद हाश्मी, सुरेंद्र मोदी,
नितीन निरावणे यांनी पुढाकार घेत महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच दिलीप पेरे, बाबा सलामपुरे यांचीही यात मदत झाली.

सुरक्षा रक्षकांचे योगदान : क्रीडा विभाग व विद्यापीठातील आपतअण्णा व प्रदीप पंडुरे या सुरक्षा रक्षकांची भूिमकाही तेवढीच महत्त्वाची राहिली. झाडांचे नुकसान करणार्‍या व्यक्तींना थेट घरीच गाठून सुरक्षा रक्षक व क्रीडा विभागातील अधिकार्‍यांनी प्रबोधन केले. यामुळे झाडांच्या संगोपनात परिसरातील लोकांनी स्वत:हून सहभाग घेतला.

आठवड्यात दोन हजार लिटर : कार्यकारी अभियंता डॉ. रवींद्र काळे क्रीडा विभागाला आठवड्यात दोन हजार लिटरचा पाणीपुरवठा करतात. यातून झाडांना दररोज पाणी दिले जाते.

ही सामाजिक सेवा
झाडांच्या संगोपनासाठी केलेले कार्य ही सामाजिक सेवा आहे. यामुळे दुष्काळावर मात करता येईल.
-डॉ.चंद्रशेखर, क्रीडा विभागप्रमुख

प्रत्येकाने उपक्रम राबवावा
समाजातील प्रत्येक नागरिकाने झाडांच्या संगोपनासाठी उपक्रम राबवावा. यामुळे जमिनीची होणारी धूप थांबेल. निसर्गाची होणारी हानीही थांबवता येईल.
-डॉ. दयानंद भक्त, संचालक, क्रीडा विभाग

कॅन, ठिबक पद्धतीचा वापर करून झाडांना पाणी
इराकी विद्यार्थ्यांचेही योगदान : क्रीडा विभागातील इराकी खेळाडूंचाही यात सक्रिय सहभाग. झाडे लावण्यापासून मातीचे वळण करणे व पाणी देण्याचे काम केले.

कार्यशाळेतच ट्री गार्ड तयार : विद्यापीठाच्या कार्यशाळेत झाडांच्या रक्षणासाठी खास ट्री गार्ड तयार करण्यात आले. जनावरांपासून झाडे वाचवण्यासाठी विशेष व्यवस्था यात आहे.

अविरत उपक्रम, दररोज
2 लिटर पाणी आणले: मैदानावर सरावासाठी येतानाच 60 मुले, 15 मुली घरून दोन लिटर पाणी सोबत आणत असत. यात कोणीही खंड पडू दिला नाही.

पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था
झाडांना पाणी देण्यासाठी दोन ते पाच लिटर क्षमतेच्या कॅनचा वापर करण्यात आला. सलाइनच्या माध्यमातून कॅनमधील पाणी ठिबक पद्धतीने दिले जात आहे. यासोबत पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.