आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Population Day Girl Born Rate High In Aurangabad

लोकसंख्या दिन विशेष: औरंगाबाद शहरात एक हजार मुलांमागे 947 मुली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- गर्भलिंग निदान चाचणी, स्त्री भ्रूणहत्येवर कडक निर्बंध आणि व्यापक जनजागृती करण्यात आल्याने शहरात मुलींच्या जन्मदरात लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या हजार मुलांमागे 947 मुली असा जन्मदर असून 2001 मध्ये हाच दर हजारामागे 848 असा होता. एक जानेवारी ते 30 एप्रिल 2013 या चार महिन्यात 7,674 मुलांच्या तुलनेत 7,200 मुलींचा जन्म झाला. हा जन्मदर 93.82 टक्के आहे.

जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने (11 जुलै) मुलींच्या जन्मदराचा आढावा घेतला असता दिलासादायक बाबी समोर आल्या. वंशाचा दिवा हवा म्हणून मुलींची गर्भातच हत्या करण्याचे प्रमाण वाढले होते; परंतु स्वयंसेवी संस्था, शासनस्तरावर प्रभावी अभियान राबवण्यात आल्याने जन्मदर वाढण्यास मदत मिळाली आहे. मागील काही वर्षांमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपच्या आमदार पंकजा पालवे-मुंडे यांनी तसेच इतर राजकीय पक्षांनीही स्त्री भ्रूणहत्येविरोधात मोहीम राबवली असल्याने याबाबत जनजागृती झाल्याचे चित्र आहे. स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने गेल्या वर्षी 17 सोनोग्राफी सेंटर सील केले होते. त्यापैकी 13 सेंटरविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. स्वयंसेवी संस्थांनी गर्भलिंगनिदान करणार्‍या डॉक्टरांचे स्टिंग ऑपरेशन करून गैरप्रकार सर्वांसमोर आणला. त्यामुळे गेल्या वर्षभरात जन्मदर वाढण्यास मदत झाल्याचा दावा मनपा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

कुटुंब सर्वेक्षण अहवाल
2012-13 च्या कुटुंब पाहणी सर्वेक्षण अहवालानुसार मनपा हद्दीतील 10 ते 19 वष्रे वयोगटातील मुलांची संख्या 88 हजार 198, तर मुलींची संख्या 77 हजार 429 आहे. गेल्या चार महिन्यांत 14 हजार 874 बालकांचा जन्म झाला. त्यात मुलींची संख्या 7 हजार 200 इतकी आहे.

सोनोग्राफी केंद्रांवर नजर ठेवावी
गर्भलिंग निदानाविषयी वृत्तपत्रांतून मोठय़ा प्रमाणात जनजागृती झाली; परंतु तरीही स्त्री भ्रूणहत्या पूर्णपणे थांबलेल्या नाहीत. त्यामुळे सोनोग्राफी सेंटरवर करडी नजर ठेवणे आवश्यक झाले आहे. स्त्री-पुरूष भेदभाव करणे चुकीचे आहे.
-प्रीती तोतला, नगरसेविका

मुलीच्या जन्माचे स्वागत करा
गर्भलिंग निदान, स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी कडक निर्बंध लादल्यामुळे मुलींचा जन्मदर वाढण्यास मदत झाली आहे. मुला-मुलींमध्ये भेद न करता मुलीच्या जन्माचे स्वागत करायला हवे.
- नीता पाडळकर, वैद्यकीय अधिकारी