आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wrestlers Efforts; But Government Doesn't Do Anything

दुलर्क्षित खेळ : पहिलवानांची धडपड; मात्र शासनाची धोबीपछाड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - औरंगाबाद शहरापासून अवघ्या 5 ते 7 किमी अंतरावर तिसगाव आहे. कुस्तीसाठी उभ्या महाराष्ट्रात ओळखल्या जाणार्‍या या गावाचे वैभव काही औरच होते. एकेकाळी पहाटे कोंबडा आरवतानाच शेकडो पहिलवानांचे दंड थोपटण्याचे आवाज घुमत. लाल मातीच्या आखाड्यात झुंजतानाच हे तरुण पारंपरिक कुस्तीचे धडे गिरवत. पिळदार मिशा आणि कमावलेल्या शरीराचा त्यांना अभिमान असायचा.

नुसत्या पहिलवानकीने कसे भागणार ?
गावची पोरं पहिलवानकी करतात हे म्हणायला बरे वाटते; परंतु पहिलवान होऊन करणार काय, संसाराचा गाडा कसा चालवायचा, रोजचा खुराक कुठून आणायचा, असे एक ना अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. त्यामुळे या गावातील जुने पारंपरिक आखाडे ओस पडत आहेत.

मातीची कुस्ती मॅटवर
पारंपरिक मातीवरच्या कुस्तीची जागा आता मॅटने घेतली आहे. तासन्तास चालणारी कुस्ती केवळ 6 मिनिटांची झाली आहे. या आधुनिकतेच्या जमान्यात तिसगावाला सुविधा मिळाल्या नाहीत. जुन्या आखाड्यात मातीत खेळणार्‍या पहिलवानांना आधुनिक प्रशिक्षणही मिळत नाही. त्यामुळे क्षमता, कौशल्य असूनही ते स्पर्धेत टिकाव धरू शकत नाहीत. त्यांना आधुनिक कोचिंग, मॅट आणि अन्य सुविधा देणे गरजेचे आहे.

दोन आखाडे, सुविधा एकातही नाहीत
50 वर्षांपूर्वी औरंगाबाद पंचायत समितीचे सभापती किसन वानखेडे यांनी तिसगावला आखाडा बांधून दिला होता. हा आखाडा आता सुविधा व डागडुजीअभावी अखेरच्या घटका मोजत आहे. दुसरीकडे तत्कालीन आमदार तथा विद्यमान शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी आमदार निधीतून पहिलवानांना अधुनिक व्यायामशाळा बांधून दिली होती. सुरुवातीला चार भिंतींचे बांधकाम झाले, मात्र पुढे आधुनिक साधनसामग्री मिळाली नाही.

नेतेमंडळींचेही दुर्लक्ष
पश्चिम महाराष्ट्रात तेथील साखर कारखाने पहिलवानांना दत्तक घेऊन त्यांच्यावरील सर्व खर्चाची जबाबदारी घेतात. यात सांगली, सातारा, कोल्हापूर आदी जिल्ह्यांचा समावेश आहे. आपल्याकडे केवळ एखाद्या स्पध्रेत कुस्ती मारली किंवा निवडणूक आली की पहिलवानांची पाठ थोपटली जाते, मात्र वेळ निघून जाताच पुढारी पाठ दाखवतात. त्यामुळे जिल्ह्यातील पहिलवानांची दुरवस्था झाली आहे.


असे होते तिसगावचे वैभव
पाच पिढय़ांपासून तिसगावात कुस्ती खेळणारे लोक आहेत. साधारणत: 50 वर्षांची परंपरा जोपासणारे मोजकेच लोक आता या गावात आहेत. निसर्गाच्या कुशीत असलेल्या या गावातील छोटासा पोरगाही दंड थोपटून आपल्या शक्तीचे प्रदर्शन करायचा. कुस्ती या खेळाच्या माध्यमातून या गावाने अनेक दिग्गज पहिलवान जन्माला घातले. कित्येक सुवर्णपदकांची कमाई करत शिवछत्रपती पुरस्कार मिळवणारे लोकही येथे आहेत, ज्यांची नावे आजही राज्याच्या कानाकोपर्‍यात घेतली जातात. अख्ख्या महाराष्ट्रात औरंगाबाद जिल्ह्याचा झेंडा फडकवला. निर्सगाच्या सान्निध्यात असलेल्या या गावाची महती इतकी होती की, महाराष्ट्र कुस्ती परिषदेत एकाच वेळी 16 पहिलवानांची निवड नुसत्या तिसगावातून झाली होती. या खेळाबरोबरच झडी पट्टा, छंदबाजी, एकतारी भजन, जखडी भजन, चौताला भजन असेही अनेक छंद येथील गावकर्‍यांना होते.

यांनी आखाडे गाजवले
तिसगावातील इस्माईल पठाण यांनी उपमहाराष्ट्र केसरी विजेतपद मिळवले. त्यानंतर पोलिस सेवेत उपनिरीक्षक म्हणून काम पाहिले. दुसरे आहेत परबत कासुरे. सात-सात सुवर्णपदके मिळवत शिवछत्रपती पुरस्काराने कासुरे यांचा गौरव झालेला आहे. गावातीलच सिकंदर बन्सी तरय्यावाले व मिठ्ठ पहिलवान तरय्यावाले यांनी उपमहाराष्ट्र केसरीचा सन्मान पटकावलेला आहे. रामचंद्र धनुलाल सूर्यवंशी यांनी ठाण्यात झालेल्या स्पध्रेत सुवणपदक मिळवलेले आहे. कन्हैया धन्नू सूर्यवंशी, तुकाराम चोपडे, पुंडलिक जाधव, कडुबा चोपडे यांच्यासारख्या अनेक दिग्गजांनी तिसगावचे नाव महाराष्ट्रात गाजवलेले आहे.


मलखांबाची भेट
गावची कुस्तीची परंपरा पाहून चकित झालेल्या सुनील दत्तनी पहिलवानांना चक्क मलखांब भेट दिला होता. त्यांनी दिलेला हा मलखांब आजही जुन्या आखाड्यात तग धरून उभा आहे. अनेक पहिलवानांनी यावर कसरत केली आहे.


काय म्हणतात पहिलवान ?
खुराक आणायचा कुठून ?
गावचे वैभव मोठे होते. आता मात्र गगनाला भिडलेल्या महागाईमुळे कुस्ती खेळणे शक्य नाही. या वाढत्या महागाईत पहिलवानांना खुराक आणायचा कुठून?
धोंडिराम त्रिंबक साळे


रेवडीवर कुस्ती मारायचो
आमच्या काळात कुस्तीला महत्त्व होते. पहिलवानांचा सन्मान केला जायचा. नुसती रेवडी, चार आणे आणि दस्त्यावर आम्ही कुस्ती मारायचो. आता ते दिवस राहिले नाहीत.
देवराव सखाराम चोपडे


ते शक्य नाही
आता आमचे वय झाले आहे. आमच्या काळात महागाई नव्हती. पहिलवानकी करून सन्मान आणि स्पध्रेतून पैसा मिळायचा. आता कुठल्या तोंडाने मुलांना कुस्तीला पाठवायचे?
कडुबा जयसिंग गायकवाड


नव्य सुविधा नाहीत
जुना आखाडा आता शेवटच्या घटका मोजतोय. पोरांना कुस्ती खेळायला मॅट पाहिजे. ती आम्ही देऊ शकत नाही. सुविधाच नाहीत, तरीही पोरं जीव लावून कुस्ती खेळतात.
कृष्णा जयसिंग गायकवाड


आम्हाला सुविधा हव्यात
आखाड्यात मातीतील कुस्तीची रोज प्रॅक्टिस करतो. जिल्ह्यात होणार्‍या कुस्ती स्पध्रेत भाग घेतात, पण आम्हाला आखाड्यात सुविधा नाहीत. त्या दिल्या जाव्यात.
राजेश देविदास पुरे


आधुनिक प्रशिक्षक हवा
वरिष्ठ पहिलवान आम्हाला कुस्ती शिकवतात. मात्र, आता बदललेल्या कुस्तीचे नवे डावपेच शिकण्यासाठी प्रशिक्षकाची गरज आहे. भगवान शेलार


चित्रपटाची शूटिंग
निसर्गाचे वरदान लाभलेल्या या गावात ‘अहिंसा’ या सुनील दत्त यांच्या चित्रपटाची शूटिंग झालेली आहे. नदीकाठी असलेले मंदिर तर आजही तेवढेच सुरेख आहे. सुनील दत्त यांनी घोड्यावरून सीन शूट करण्यासाठी मंदिर आणि नदीची जागा निवडली होती. या वेळी सोबत रेखा, मोहन चोटी, रणजित हे दिग्गज कलाकारही होते. या सर्वांनी देवराव चोपडे यांच्या वाड्यात जेवण घेतले होते.