आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Writer Baba Bhand Story In School Book, Divya Marathi

तिसरी-चौथीच्या पाठय़पुस्तकांत शिंदे, भांड, सराफ यांच्या कथा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - केवळ राज्यातच नव्हे, तर देशपातळीवरील नावाजलेल्या साहित्यकृतींची नोंद पाठय़पुस्तक निर्मिती मंडळाने घेतली आहे. आगामी शैक्षणिक वर्षातील तिसरी आणि चौथी या वर्गांसाठीच्या बालभारतीच्या पुस्तकात लीला शिंदे, बाबा भांड, सूर्यकांत सराफ यांच्या साहित्यकृतींचा समावेश करण्यात आला आहे. हा उपक्रम राबवताना मंडळाने स्थानिक लेखकांना मानाचे स्थान देत विद्यार्थ्यांना कथा, नाट्यछटांचे अवलोकन करण्याची संधी दिली.

अखिल भारतीय साहित्य संमेलन असो अथवा वेगळ्या आशयाची मांडणी. यातून मराठवाड्यातील साहित्यिक हे नेहमी चर्चेचा विषय बनले आहेत. एवढेच नाही, तर त्यांच्या साहित्य कृतीची दखलही वेळोवेळी विविध स्तरांवर घेतली गेली असून आता मराठवाडा, औरंगाबादमधील स्थानिक लेखकांनी बच्चे कंपनीच्या पाठय़पुस्तकातही प्रोत्साहनपर साहित्यकृती देऊन स्थान निर्माण केले आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षात बदल करण्यात आलेल्या तिसरी व चौथीच्या वर्गातील मराठी बालभारतीच्या नव्या अभ्यासक्रमात औरंगाबादमधील प्रसिद्ध बालसाहित्यिक बाबा भांड, प्रा. लीला शिंदे, सूर्यकांत सराफ आणि इंद्रजित भालेराव यांच्या साहित्याचादेखील समावेश करण्यात आला आहे. वेगळ्या विचारांना विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा हा पहिल्यांदाच प्रयत्न बालभारतीच्या वतीने करण्यात आला आहे.
या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता तिसरी व चौथीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. वाढती स्पर्धा आणि विद्यार्थ्यांच्या वयानुसार त्यांना गुणवत्तापूर्ण, सचित्र वास्तव माहिती समजून सांगण्याचा प्रयत्न या पाठय़पुस्तकांच्या माध्यमातून करण्यात आला आहे. यात बालसाहित्यिक बाबा भांड यांच्या ‘सयाजीराव गायकवाड’ या कादंबरीवर आधारित असलेली ‘गुणग्राहक राजा’ ही गोष्ट इयत्ता चौथीच्या मराठीच्या पुस्तकात घेण्यात आली आहे, तर प्रा. लीला शिंदे यांच्या ‘आनंदाचं झाड’ या बालमन आणि निसर्ग, मनोरंजनाचा भावनिक ठाव घेणारा धडादेखील पुस्तकात समाविष्ट करण्यत आला आहे. अभिनय आणि बालमन यांची सांगड घालत नाट्यरूपाची साद देणारे सूर्यकांत सराफ यांनी लिहिलेल्या ‘आम्हालाही हवाय मोबाइल’या नाट्यछटेचा समावेश पुस्तकात करण्यात आला आहे. या बरोबरच आपल्या कवितांमध्ये सामान्य मानवी जीवनातील भावनांना प्रथम स्थान देणारे इंद्रजित भालेराव यांच्या ‘दोस्त’ या कवितेलाही इयत्ता तिसरीच्या मराठी बालभारतीत समाविष्ट करण्यात आले आहे.