आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्रजी तपासण्यासाठी लेखी परीक्षा - कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी कुलसचिवपदासाठी धरलेला लेखी परीक्षेचा आग्रह वादाच्या भोवर्‍यात अडकला आहे. बुधवारी (१० जून) मुलाखतीस आलेल्या १८ पैकी १७ जणांच्या स्वाक्षरीने राज्यपाल तथा कुलपती सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे निवेदनवजा तक्रार केली आहे. कुलगुरू डॉ. चोपडे यांनी मात्र अशा तक्रारींना गांभीर्याने घेत नसल्याचे म्हणत, संभाव्य कुलसचिवांना इंग्रजी लिहिता, वाचता, बोलता येते की नाही याच्या तपासणीसाठी २५ जूनला लेखी परीक्षा घेणारच, असा निर्धार केला आहे.

कुलसचिवपदासाठीच्या लेखी परीक्षेमुळे सर्व उमेदवार कुलगुरूंच्या विरोधात गेले आहेत. लेखी परीक्षेचा निर्णय रद्द करण्यासाठी कुलगुरूंना निवेदन दिले आहे. या पदासाठी लेखी परीक्षेची कायद्यात तरतूद नसल्यामुळे घेऊ नये, या अाशयाची निवेदनवजा तक्रार राज्यपाल तथा कुलपती सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केल्याचे उमेदवार डॉ. शंकर अंभोरे यांनी सांगितले आहे. प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. यशवंत खिल्लारे यांचीही दुसर्‍या क्रमांकावर स्वाक्षरी असून देशात किंवा राज्यात कुठेही लेखी परीक्षा झाल्याचे ऐकिवात नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. कुलगुरू मात्र लेखी परीक्षेवर ठाम असून आपण परीक्षा नियंत्रकांच्या लेखी परीक्षा घेतल्या आहेत.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठानेही परीक्षा नियंत्रकपदासाठी लेखी परीक्षा घेतली आहे. कुलसचिव परीक्षा नियंत्रक हे दोन्ही पदे जवळपास समान आहेत, त्यामुळे लेखी परीक्षेस विरोध असण्याचे काहीच कारण नाही. उमेदवारांपैकी ८० टक्यांना इंग्रजीत एक वाक्य लिहता अथवा बोलता येत नाही. त्यामुळे त्यांची लेखी परीक्षा घेणारच आहोत असेही कुलगुरूंनी स्पष्ट केले. इंग्रजी येत नसल्यामुळे बहुदा परीक्षेला विरोध होत असावा असा संशय येत असल्याचेही त्यांनी म्हटले. परीक्षा नियंत्रक डॉ. प्रल्हाद लुलेकर यांच्या मते कायद्यात तरतूद नाही हे खरे असले तरी मुलाखतीचे स्वरूप लेखी की, तोंडी असावे हे ठरवण्याचा अधिकार कुलगुरूंना आहे. त्यामुळे लेखी परीक्षेवरून वादंग उठवण्यात काहीच अर्थ नाही. मुलाखत कशी असावी, याचे सुस्पष्ट निर्देश नसतातच त्यामुळे तोंडीचाच आग्रह धरणे गैर आहे.

तक्रारीवर दिग्गजांच्या स्वाक्षर्‍या
स्वामीरामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी परीक्षा नियंत्रक डॉ. रवी सरोदे, डॉ. खिल्लारे, प्राचार्य डॉ. प्रदीप जब्दे, प्राचार्य डॉ. प्रदीप दुबे, डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. पंढरीनाथ रोकडे आदींसह मुलाखतीला उपस्थित १८ पैकी १७ जणांच्या स्वाक्षर्‍या आहेत. शैक्षणिक विभागाचे उपकुलसचिव ईश्वरसिंग यांची मात्र स्वाक्षरी नाही.
बातम्या आणखी आहेत...