आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅशलेसचा फटका: आरटीजीएस क्रमांक चुकला, शेतकऱ्याचे 1 लाख दुसऱ्याच्या खात्यावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव- आरटीजीएस करताना शेतकऱ्याकडून नजरचुकीने खाते क्रमांक चुकल्याने एक लाख रुपये दुसऱ्याच ग्राहकाच्या खात्यात जमा झाले. या खातेदाराने हे पैसे देण्यास मागील दोन महिन्यांपासून नकार दिल्याने तालुक्यातील देपेगाव येथील नवनाथ गोपाळ या शेतकऱ्याला आर्थिक फटका बसला आहे.
 
मोदी सरकार एकीकडे कॅशलेस व्यवहार करण्यावर भर देत असले तरी ग्रामीण भागात शेतकऱ्यांना अशा प्रकारे फटका बसल्यावर बँका हात वर करीत आहेत. दरम्यान, शेतकऱ्याने पैशासाठी कोर्टामार्फत बँकेला नोटीस पाठवली आहे. 

कारखान्याच्या मुकादमाला एक लाख रुपये देऊन आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी नवनाथ गोपाळ यांनी डिसेंबर २०१६ रोजी माजलगाव येथील राजर्षी शाहू बँकेच्या शाखेतून नारायण विठ्ठल मुंडे (रा. भोगलवाडी) यांच्या नावाने तेलगाव येथील बँक ऑफ इंडिया शाखेतील खाते क्रमांक ०७६२१०११०००६८४२ वर आरटीजीएसच्या माध्यमातून एक लाख रुपये जमा करायचे होते. परंतु वरील खाते क्रमांकातील एक अंक नजरचुकीने बदलून ०७६२१०११००००८४२ असा लिहिण्यात आला. ज्या खातेदाराला पैसे पाठवायचे होते त्याचे नाव बरोबर होते; परंतु खाते क्रमांकात मात्र एक अंक चुकला होता.
 
दरम्यान, तेलगावच्या बँक ऑफ इंडियाने ही रक्कम राजर्षी शाहू बँकेला परत पाठवणे गरजेचे होते. परंतु या बँकेने ही रक्कम वरील खाते क्रमांक असलेल्या दौलत महादेव बडे यांच्या खात्यातच जमा केली. आपल्या खात्यावर लाख आल्याचे पाहून दौलत बडे यांनी ही रक्कम उचलून दुसऱ्या खात्यावर ट्रान्सफर केली. ही चूक नवनाथ गोपाळ यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी राजर्षी शाहू बँकेतील अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. परंतु त्यांनी ही चूक बँक ऑफ इंडियाची असल्याने सांगितले. 

खरी चूकबँक ऑफ इंडियाची असतानाही तेथील अधिकारी काहीच कारवाई करीत नाहीत. या प्रकारामुळे ग्रामीण भागातील लोक कॅशलेस व्यवहारांवर विश्वास ठेवणार नाहीत. 
- नवनाथ गोपाळ, शेतकरी, देपेगाव 

सदरील चूकआमच्या बँकेची नसून बँक ऑफ इंडियाने खातेदाराचे नाव, खाते क्रमांक बघून रक्कम ट्रान्सफर करणे अपेक्षित होते. त्यांनीच संबंधित व्यक्तीवर कारवाई करायला पाहिजे. 
- एस. बी. नेवाडे, शाखाधिकारी, राजर्षी शाहू बँक 

दुसऱ्या खातेदाराकडून रक्कम देण्यास टाळाटाळ 
शेतकरी गोपाळ यांच्या नजरचुकीने दौलत बडे यांच्या खात्यावर एक लाख रुपयांची रक्कम ट्रान्सफर झाली असून गोपाळ यांनी अनेक वेळा त्यांच्याशी भेटून पैसे परत करण्याची मागणी केली आहे. परंतु आज, उद्या करून दौलत बडे यांनी रक्कम परत देण्यास टाळाटाळ केली. 
बातम्या आणखी आहेत...