औरंगाबाद- मुंबई महापालिका निडणुकीपूर्वी शिवसेना - भारतीय जनता पक्षाची युती तटणार असल्याचे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्तवले आहे. सत्तेत सहभागी व्यक्तीकडूनच शिवसेना-भाजपमधील संभाव्य दुराव्याविषयी माहिती मिळाल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे इतिहासकार नसल्याच्या जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याशी
आपण सहमत नसल्याचेही पवारांनी म्हटले आहे. आव्हाडांचे ते वैयक्तिक मत आहे. आर.आर.हे आबा चांगले गृहमंत्री होते. त्यांच्या कारकिर्दमध्ये कोणाचेही खच्चीकरण झाले नाही. आबांनी पोलिसांचे मनोबल वाढवले होते. त्यामुळे त्याच्यावर पोलिस विभागातील प्रत्येकाचा विश्वास होता, असेही पवारांनी याप्रसंगी सांगितले.
गेली 10 वर्षं केंद्रात असताना ऊस आणि साखरेचे भाव योग्य राहतील याची काळजी घेतली. परंतु केंद्रात भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर वर्षभरातच शेतकर्यांची दुरवस्था झाल्याचा आरोप शरद पवार यांनी केला.
दरम्यान, शरद पवार यांचे हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ हा पुतळा बसवण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योजक मधुकर मुळे होते. सोमवारी सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम झाला.
शरद पवार यांचे रविवारी सायंकाळी वाजता शहरात आगमन झाले. चिकलठाणा विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी ते हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये थांबले होते.
फ. मुं. शिंदे, कौतिकराव ठाले पाटील, के. एस. अतकरे, राजेश सरकटे, जलतज्ज्ञ विजयअण्णा बोराडे, आ. सतीश चव्हाण, भाऊसाहेब चिकटगावकर, माजी आमदार संजय वाघचौरे, विनोद पाटील, मधुकरराव मुळे, कमाल फारुकी तसेच नुकतेच भाजपमध्ये गेलेले दत्ताभाऊ पाथ्रीकर यांनी तेथे पवारांची भेट घेतली.