आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योग जगताचा सच्चा मित्र हरपला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- निर्लेप समूहाचे संस्थापक संचालक यशवंत भोगले यांच्या निधनाने औरंगाबादच नव्हे, तर मराठवाड्यातील औद्योगिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाने उद्योग जगताचा मित्र हरपला, अशा शब्दांत शहरातील मान्यवर उद्योजकांनी हळहळ व्यक्त केली.

प्रतिकूल परिस्थितीत निर्लेप उद्योग समूहाचा पाया रचण्यात यशवंतरावांचा सिंहाचा वाटा होता. आयुष्यभर उद्योजकतेचा मंत्र जपणारे हे विलक्षण कष्टाळू व्यक्तिमत्त्व रविवारी काळाच्या पडद्याआड गेले. सोमवारी (14 ऑक्टोबर) सकाळी 10.30 वाजता प्रतापनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे ज्येष्ठ पुत्र माधव भोगले यांनी त्यांना मुखाग्नी दिला. या वेळी शहवासीयांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना उद्योजक उल्हास गवळी म्हणाले, यशवंतकाका प्रत्येकाच्या मदतीला धावून जात होते. त्यांच्या मोलाच्या सल्ल्यातून अनेकांना प्रगतीचा मार्ग सापडला. सीएमआयएचे (चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अँग्रिकल्चर) अध्यक्ष मिलिंद कंक म्हणाले, भोगले शेवटच्या श्वासापर्यंत निर्लेपशी निगडित होते. या समूहाच्या पायाभरणीत त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या जाण्याने उद्योग जगताची मोठी हानी झाली आहे.

जगभरात लोकप्रिय असलेल्या निर्लेपच्या नॉनस्टिक भांड्यांची निर्मिती यशवंतरावांच्याच प्रयत्नातून झाली. त्यांनी त्या वेळी देशभरात निर्लेपचे नाव पोहोचवण्यासाठी खडतर मोहीम हाती घेतली होती. त्या काळात फारशी जाहिरातीची माध्यमे नव्हती. ते घरोघरी जाऊन नॉनस्टिक भांड्यांची उपयुक्तता सांगणारे प्रात्यक्षिक करून दाखवत असत.

उत्पादकच घरी येऊन उत्पादनाची अशा पद्धतीने माहिती देत असल्याचा तो आगळावेगळा प्रयोग होता. किमान पाच हजार ठिकाणी त्यांनी केलेल्या सादरीकरणातून निर्लेप उत्पादनांच्या वितरणाची मोठी साखळी निर्माण झाली. ही साखळीच पुढे निर्लेप समूहाचे बलस्थान बनली. याप्रसंगी प्रख्यात उद्योजक मानसिंग पवार, अजित सावे, विवेक देशपांडे, मिलिंद केळकर, मिलिंद बापट, राम भोगले, सोलापूर अर्बन बँकेचे भागवत, निर्लेपचे किरण जोशी, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख नंदकुमार घोडेले आदींची उपस्थिती होती.