आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद - उसाचे पीक दांडाच्या पाण्यावर घेतले जाते. त्यासाठी कोणी ठिबक करत नाही. परिणामी भूगर्भातील पाणी कमी होत चालले आहे, असे सांगून या परिस्थितीला माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणच जबाबदार आहेत, अशी टीका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शरद जोशी यांनी गुरुवारी केली. दुष्काळ पाहणी दौ-याच्या प्रारंभी आडगाव निपाणी येथे ते बोलत होते.
ते म्हणाले, यशवंतरावांनी ऊस नावाचे पीक आणले. साखर कारखाने सुरू करताना विशिष्ट जातीचीच मक्तेदारी निर्माण केली. पाणी आहे की नाही याचा विचार न करता धडाधड कारखाने उभे ठाकले. प्यायला पाणी नसणा-या जिल्ह्यात 10 ते 12 कारखाने आहेत. पिण्यासाठी पाणी नसेल तर तेथे ऊस हवाच कशाला, असा सवालही जोशी यांनी केला.
मराठवाड्यातील नद्या पश्चिम घाटात उगम पावतात. वाटेत त्यांचे पाणी अडवले जाते किंवा त्याचा उपसा केला जातो. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण यांच्या कृपेने प. महाराष्ट्राला पाणी मिळत असल्याने आपल्याकडे पाणी येत नाही आणि उपलब्ध पाण्याचा आपण भयंकर उपसा करतो. त्यामुळे दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांबरोबरच आपणही गुन्हेगार आहोत, असे जोशी म्हणाले.
पॅकेजबाबत ते म्हणाले की, ही शेतक-यांची थट्टा आहे. यामुळे पाणी मिळणार आहे काय? दिल्ली किंवा मुंबईहून निघालेले पॅकेज अधिकारीच खाऊन घेतात. शेतीमालाला भाव नसणे हे शेतक-यांच्या आजारांचे मूळ असून केवळ शासकीय मदतीवर विकास शक्य होत नाही, असे शरद जोशी म्हणाले.
कर्जमुक्तीनंतरच डोळे मिटेन
प्रकृती अस्वास्थ्यामुळे जोशी यांनी उभे न राहता बसूनच भाषण करावे, अशी विनंती उपस्थितांनी केली. मात्र, त्यांनी उभे राहूनच भाषण केले. ते म्हणाले, ‘माझ्या प्रकृतीची काळजी करू नका. हिंदुस्थानातील एक ना एक शेतक-याच्या डोक्यावरील कर्ज फिटल्याशिवाय मी डोळे मिटणार नाही. शेतकरी कर्जमुक्त झाल्यानंतरच मी जाणार आहे.’या वेळी महिला आघाडीच्या जयश्री पाटील, अॅड. प्रकाशसिंग पाटील, कैलास तवार, गोविंद जोशी आदी उपस्थित होते.
घोटाळ्यामुळेच दुष्काळ
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंचनाच्या कामात 70 हजार कोटींचा घोटाळा केला नसता तर मराठवाड्यात वेगळे चित्र दिसले असते. टंचाईला हा घोटाळाही तेवढाच जबाबदार आहे, असा आरोप शरद जोशी यांनी केला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.