आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yelganga River Will Be Developed By Caring Friends Organization

येळगंगा नदीच्या विकासासाठी सरसावली केअरिंग फ्रेंड्स संस्था, विकासकामाला वेग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ - ऐतिहासिक तसेच धार्मिक महत्त्व असलेल्या येळगंगा नदीच्या विकासासाठी मुंबईच्या केअरिंग फ्रेंड्स या संस्थेने मदतीचा हात पुढे केला आहे. नदीची सफाई, रुंदीकरण, खोलीकरणासह इतर कामांसाठी या संस्थेने दीड लाख रुपयांचा निधी देऊ केल्यामुळे या कामाला वेग आला आहे.

जिल्हा परिषदेचे सीईओ डाॅ. अभिजित चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली १३ मार्चपासून सुरू झालेल्या येळगंगा नदीच्या विकासकामासाठी संत जनार्दन महाराज स्वामी आश्रम, घृष्णेश्वर देवस्थान संस्थान, महाराष्ट्र ग्रामीण बँकेने अार्थिक मदत केली. या माध्यमातून साधारण दोन किलाेमीटरचे काम करण्यात आले. डोहही बनवण्यात आले होते. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने दिलेला पाच लाख रुपयांचा निधी लवकरच संपण्याची चिन्हे असल्यामुळे या अभियानासाठी परिश्रम घेणारे आनंद असोलकर, निश्चल शेंडे, जिल्हा परिषद सदस्य शैलेश क्षीरसागर, गटविकास अधिकारी विठ्ठल हरकळ हे मदतीसाठी आवाहन करत होते. या आवाहनाला प्रतिसाद देत केअरिंग फ्रेंड्स संस्थेने यवतमाळ येथील दिलासा संस्थेमार्फत दीड लाखांचा निधी देऊ केला. केअरिंग फ्रेंड्सचे पथक लवकरच येळगंगा नदीची पाहणी करणार असून आणखी निधी देण्याची तयारीही या संस्थेचे निमेश सुमती यांनी दाखवली आहे. मुंबईतील संस्थेने कामाची दखल घेत मदत दिली. त्यामुळे स्वयंसेवकांचा उत्साह दुणावला आहे. सोशल साइट्सच्या माध्यमातून या कामाबाबत माहिती मिळाल्यानंतर मदतीसाठी अनेकांनी पुढाकार घेतल्याने हे अभियान लोकचळवळ बनले आहे. शुक्रवारी स्वामी शांतीगिरी महाराजांनी या कामांची पाहणी करत स्वयंसेवकांकडून माहिती घेतली. या वेळी माजी नगराध्यक्ष हाजी अकबर बेग, आनंद असोलकर, पुष्पानंद गायकवाड आदींची उपस्थिती होती.

आवाहनाला व्यावसायिकाचा प्रतिसाद
वेरूळ येथील येळगंगा नदीमध्ये अनेक व्यावसायिक घाण पाणी सोडत होते. यामुळे नदीपात्रास नालीचे स्वरूप आले होते. यामुळे प्रशासनासह "दिव्य मराठी'ने वारंवार आवाहन करून हा प्रकार थांबवण्यासाठी प्रयत्न केले. या आवाहनाला प्रतिसाद देत वेरूळ लेणीसमोरील वृंदावन हाॅटेलच्या (जैन रेस्टॉरंट) चालकांनी शौचखड्डा बनवून इतर व्यावसायिकांसमोर आदर्श निर्माण केला. दरम्यान, नदीपात्रात घाण पाणी सोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे तहसीलदार सचिन घागरे यांनी सांगितले.
पुढील स्लाइडवर वाचा, काम थांबवलेल्या शेतकर्‍यांचाही कामाला पाठिंबा...

फोटो - शांतीगिरी महाराजांनी शुक्रवारी सायंकाळी येळगंगा नदीच्या विकासकामांची पाहणी करून स्वयंसेवकांकडून माहिती घेतली. छाया : वैभव किरगत