आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Young Boy Suicide Attempt At Aurangabad Municipal Corporation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद महापालिकेत युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- प्लॉटमध्ये जाणारा मार्ग बिल्डरने अडवल्याचा आरोप करत सातारा परिसरातील जयभीमनगरातील रवी गवई या युवकाने मनपाच्या नगररचना विभागात शुक्रवारी (15 फेब्रुवारी) सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला; परंतु नागरिक आणि सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवत सिटी चौक पोलिसांच्या स्वाधीन केले.

रवीचे वडील दुर्योधन गवई यांनी 1990 मध्ये गट क्रमांक 72 मधील 45 क्रमांकाचा एक हजार चौरस फुटांचा प्लॉट खरेदी केला आहे. बालाजी पाटील या बिल्डरने प्लॉटमध्ये जाणारा मार्ग अडवल्याचा आरोप करून मार्ग खुला करून देण्याची मागणी सन 2011 पासून करत असल्याचे रवीचे म्हणणे आहे. 6 फेब्रुवारीला आत्मदहनाचा इशारा दिला होता. तरीदेखील प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने रवी शुक्रवारी आई -वडील आणि मित्रांना सोबत घेऊन याचा जाब विचारण्यासाठी नगररचना विभागात आला होता; परंतु अधिकार्‍यांकडून कोणतेच उत्तर मिळत नसल्याने गवईने उपअभियंता ए. बी. देशमुख यांच्या कार्यालयासमोर अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला; परंतु त्याचे आई -वडील, मित्र, सुरक्षा रक्षकांनी त्याला वेळीच रोखले. या वेळी महापालिकेत एकच गोंधळ उडाला होता. नगरसेवक राज वानखेडे, गौतम खरात यांनी रवीला समाजावून मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची भेट घेतली. त्यानंतर आयुक्तांनी दोन दिवसांत यावर निर्णय घेणार असल्याचे सांगितले. सिटी चौक पोलिसांनी रवीला अटक केली आहे.

एक दिवसापूर्वीच या प्रकरणाची सुनावणी झाली. यात बिल्डरने रस्ता देण्याचे मान्य केले. रवीला हे माहिती नसावे. त्याने 6 फेब्रुवारी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्याचा राग अनावर झाला व अंगावर रॉकेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न झाला.
-राजगौरव वानखेडे, नगरसेवक.