आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नापिकीच्या चिंतेतून युवा शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोकरदन- गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने पिकांची वाढ खुंटल्याने चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. अप्पा रावसाहेब जाधव असे या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी विष प्राशन केले होते. शनिवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

१७ ऑगस्ट रोजी अप्पा जाधव शेतात कपाशीवर औषध फवारणीसाठी गेले होते. दरम्यान, सावखेडा परिसरात गेल्या २५ दिवसांपासून पाऊस नसल्याने या परिसरातील उभी पिके सुकून गेली होती. जाधव यांच्या तीन एकर शेतातही हीच अवस्था होती. शेतात मका कपाशी सुकत असल्याचे पाहून त्यांना नैराश्य आले होते, याच चिंतेतून १७ ऑगस्ट रोजी विष प्राशन केले. शेजारील शेतात काम करणाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी अप्पा जाधव यांना उपचारासाठी औरंगाबादच्या दाखल केले. उपचारादरम्यान शनिवारी सकाळी वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. सावखेडा येथे शनिवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोळा सण अवघ्या एक दिवसावर आला असताना हा प्रकार घडल्याने सावखेडा गावावर शोककळा पसरली आहे. अप्पा जाधव यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील भाऊ असा मोठा परिवार आहे. 

पावसाचा मोठा खंड 
काहीठिकाणी ३२ ते ५३ दिवस पावसाचा खंड पडला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ३७८ मिमी पावसाची अपेक्षा होती, मात्र आतापर्यंत २५१ मिमी पाऊस झाला. हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या ३५ टक्के, आजपर्यंतच्या सरासरीच्या ५९ टक्के आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यात काही ठिकाणी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

पावसाच्या खंडामुळे खरिपाचे मोठे नुकसान 
पावसाचा मोठा खंड पडल्याने खरिपाच्या सोयाबीन, कापूस या पिकांची उत्पादकता ३०-३० टक्क्यांपर्यंत घटण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे, तर मका, बाजरी या पिकांची अनेक ठिकाणी वाढ खुंटली आहे. काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणीही केली आहे. दुसरीकडे उडीद, मूग ही पिके हातची गेली आहेत. अशा परिस्थितीत जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. 

वर्षभरात ५३ आत्महत्या 
जिल्ह्यातजानेवारीपासून आजपर्यंत ५३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आहे. यातील ४५ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात आली आहे, तर निकषात बसत नसल्याने एका शेतकऱ्याच्या कुटुंबीयास मदत देण्यात आलेली नाही. गेल्या आठवडाभरात जिल्ह्यातील ही तिसरी शेतकरी आत्महत्या आहे. 
बातम्या आणखी आहेत...