आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढदिवशीच युवकाचा झाला अपघाती मृत्यू, बजरंग चौकातील तोच रस्ता, तेच गतिरोधक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शुक्रवारी त्याचा वाढदिवस होता. रात्रीचे बारा वाजले आणि नातेवाईक, मित्रांचे कॉल, मेसेजद्वारे शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. जिवलग मित्रांनी कॅनॉटला केक कापण्यासाठी बोलावले. मित्रांच्या प्रेमापोटी तो तत्काळ दुचाकीवर कॅनाॅटला गेला. मित्रांना भेटून केक कापून घरी निघाला, परंतु नियतीच्या मनात वेगळेच काहीतरी होते. बुधवारच्या रात्रीच ज्या गतिरोधकाने तरुण बँक कर्मचाऱ्याचा बळी घेतला त्याच गतिरोधकावरून त्याचीही दुचाकी उसळली आणि वाढदिवसादिवशीच त्याला मृत्यूने गाठले. विजय जयंतराव तांबरे (२१, रा. नवभारत सोसायटी, एन-८) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. गुरुवारी रात्री १२.३० वाजता बजरंग चौकाच्या अलीकडे असलेल्या साईनगर चौकात घटना घडली.
बुधवारी रात्री साईनगर चौकातच तरुण बँक कर्मचारी कामावरून परतत असलेल्या योगेश मुंजाळ (२८, रा. एन-९) याचा याच गतिरोधकामुळे मृत्यू झाला होता. बीएस्सी उत्तीर्ण विजय रात्री बारा वाजता घरीच होता. शुक्रवारी वाढदिवस असल्याने त्याला रात्री बारा वाजता शुभेच्छांचे कॉल, मेसेज सुरू झाले. रात्री बाराला कॅनॉट प्लेस येथे केक कापून वाढदिवस साजरा करण्याचे मित्रांनी ठरवले होते. विजयचे आई, वडील भाऊ गावाला गेलेले होते तर वहिनी एकटीच घरी होती. विजय बारा वाजता कॅनॉटला गेला. मोठ्या आनंदाने कॅनॉट प्लेसमध्ये वाढदिवस साजरा करून विजय चिश्तिया चौकातून बजरंग चौकाकडे निघाला होता, परंतु बजरंग चौकाच्या अलीकडील साईनगर चौकातील गतिरोधक त्याला कळलाच नाही. गतिरोधकावरून दुचाकी जाताच योगेशचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी उसळल्याने सुमारे २० ते २५ फुटांपर्यंत दुचाकी घसरत जाऊन दुभाजकावर आदळली. यात विजयच्या छाती डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. काहींनी त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. घटनेची माहिती कळताच गस्तीवर असलेले सिडको पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती, उपनिरीक्षक मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून तपास मोरे करत आहेत.

बजरंग चौकातील तोच रस्ता, तेच गतिरोधक, तीच वेळ ... : बुधवारीरात्री बँक कर्मचारी योगेश मुंजाळ (२८) हा काम आटोपून घरी जात असताना १२.३० च्या सुमारास याच जागेवर अपघात झाला. योगेश घरात लहान होता. याच गतिरोधकावरून त्याचा तोल गेल्याने डोक्याला गंभीर इजा झाली होती. दुसऱ्या दिवशी रात्री (गुरुवार) विजय घरी जात असताना १२.३० च्या सुमारासच गतिरोधकावरून दुचाकी उसळली आणि मरण पावला. विजयच्या पश्चात आई, वडील, भाऊ वहिनी, एक बहीण आहे. विजय सुध्दा घरात लहानच होता. त्याचे वडील जयवंत तांबरे हे सेवानिवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकारी आहेत.

बहिणीच्या शुभेच्छा शेवटच्या ठरल्या : कॅनॉटप्लेस येथे जाण्यापूर्वी विजयला त्याच्या बहिणीने मुंबईहून मोबाइलवरून शुभेच्छा दिल्या. त्या शुभेच्छा शेवटच ठरल्या. बहिणीसोबत बोलून झाल्यानंतर विजय घराबाहेर पडला. अपघात झाल्यानंतर पोलिसांनी विजयचा लास्ट कॉल तपासला असता त्याच्या बहिणीचा क्रमांक निघाला आणि नंतर कुटुंबापर्यंत माहिती पोहोचली.
रेडियमशिवायगतिरोधक, अर्ध्या रस्त्यावर वाळू पसरलेली : बुधवारीएका तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर मनपा प्रशासनाला जाग आली नाही. दुभाजकाची पाहणी करण्यासाठी कुणी अधिकारी आले नाही तसेच वाळू सुध्दा काढण्यात आली नाही. दिवसातून १० ते १५ दुचाकीस्वार या गतिरोधकामुळे वाळूमुळे पडत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

पीएचडीच्या विद्यार्थ्यानेच दोघांना पोहोचवले दवाखान्यात : बुधवारीरात्री पहिला अपघात झाला तेव्हा एक पीएचडीचा विद्यार्थी घरी जात होता. त्यानेच योगेशला दवाखान्यात पोहोचवण्यात मदत केली. गुरुवारी रात्री हा विद्यार्थी पुन्हा याच वेळेला घरी परतत असताना पुन्हा विजयचा अपघात पाहिला. त्याने तत्काळ इतरांच्या मदतीने जवळच असलेल्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तोपर्यंत तेथे चार्ली कर्मचारी पोहोचले होते. त्याने बुधवारचा प्रसंग चार्लीला सांगितला. सदर विद्यार्थ्याने दवाखान्यात नाव नोंदवल्याने त्याचे नाव मात्र कळू शकले नाही.

बातम्या आणखी आहेत...