औरंगाबाद - सध्याच्या निवडणुकीत एक हजार रुपयांत एक मत विकत घेण्याचे प्रकार सुरू आहेत. त्याचा हिशेब काढला तर दर दिवसाला ५० पैसे असे गणित येते. त्यामुळे
आपल्या मताची किंमत ५० पैसेच का? याचा विचार मतदारांनी करावा, असे आवाहन प्रख्यात अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले.
‘पुन्हा गोंधळ, पुन्हा मुजरा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रख्यात अभिनेते सयाजी शिंदे, चित्रपट लेखक, गीतकार अरविंद जगताप यांच्यासह अनासपुरे औरंगाबादेत आले होते. त्या वेळी त्यांनी ‘दिव्य मराठी’ कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन संपादकीय सहका-यांशी संवाद साधला. सध्या निवडणुकीच्या रणधुमाळीविषयी मकरंद म्हणाले की, आज विधानसभेच्या २८८ जागांसाठी सुमारे ७ हजार उमेदवार रिंगणात आहेत. प्रत्येकी एक कोटी या हिशोबाने ७ हजार कोटी रुपये खर्च करत आहे. दुसरीकडे रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्याच्या मूलभूत सुविधा सर्वांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. अनेक वर्षांपासून आपण निवडणुका पाहतो आहोत; पण परिस्थिती बदलली नाही. ४० वर्षांपासून रस्त्यांची अवस्था तशीच आहे. म्हणून आता मतदारांनी सुज्ञपणे मताच्या किमतीचा विचार करण्याची गरज आहे, असे आवाहनही त्यांनी केले.
सयाजी शिंदे म्हणाले की, सध्याचे राजकारणी आपण हुतात्मा असल्याच्या आविर्भावात आहेत. सध्याचे राजकारण हे तर मनोरंजनासारखेच झाले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दोन तास आधी चार पक्षांत जाणारे राजकीय नेते आपण सध्या सगळीकडेच पाहत आहोत. यातून कुणी आणि काय आदर्श घ्यावा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळेच असे प्रकार टाळण्यासाठी मतदानाचे शस्त्र आपल्या हाती आहे. ते कसे वापरावे याचा विचार सर्वांनीच करायला हवा’, असे आवाहन त्यांनी केले.