Home »Maharashtra »Marathwada »Aurangabad» Youth Commits Suicide Due To Torture; Police To Show Offense

DvM Xpose: आत्महत्येआधी केली चिमुकलीशी बोलण्याची विणवणी, हृदय पिळवटणारा ऑडियो

रवी गाडेकर. ९७६५५५५२८८ | Jun 20, 2017, 16:25 PM IST

  • मला माझ्या मुलीशी बोलू द्या... म्हणत तरुणाने त्यांची काळजी घेण्याचे मित्राकडून वचन घेतले.
औरंगाबाद:सातारा परिसरातील एक तरुण राहत्या घरी फाशी घेऊन आत्महत्या करतो. अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिस फाइल बंद करतात. मात्र, प्रत्यक्षात सासू-सासरे आणि दोन मेहुण्यांनी केलेल्या छळामुळेच त्याने आपली जीवनयात्रा संपवल्याचे मृत्युपूर्वी त्याने मित्राशी केलेल्या संभाषणामधून स्पष्ट झाले आहे. याचे ढळढळीत पुरावे म्हणजे त्याच्या संभाषणाची मोबाइल रेकॉर्डिंग. मला मराठी लिहीता येत नाही, त्यामुळे हे रेकॉर्डींगच पत्र म्हणून ग्राह्य धरावे असे त्याने फोनवर म्हटले आहे.
संदीपच्या आईनेही तसाच आरोप केला आहे. ही रेकॉर्डिंगही नष्ट करण्याचा प्रयत्न झाला, पण योगायोगाने मोबाइलच्या फाइल मॅनेजरमध्ये ती शाबूत असल्याने हे सत्य महिनाभरानंतर समोर आले आहे. संदीपच्या घरच्यांचे आरोप, पत्नी मुलाशी त्याचे झालेले संभाषण हे सारे बिंदू तपासल्यास या प्रकरणात खऱ्या अर्थाने न्याय दिला जाईल.
सातारा परिसरातील तरुण व्यावसायिक संदीप जिजाभाऊ अंभोरे या ३६ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्जाच्या ओझ्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तूर्तास पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू असल्याचे ते सांगत आहेत.

सासुरवाडीच्या लोकांचे आरोप
संदीपचे अश्विनी दाभाडे या मुलीसोबत ३० नोव्हेंबर २००९ रोजी लग्न झाले होते. त्याला समृद्धी आणि सिद्धांत ही दोन मुले आहेत. गेल्या काही दिवसांपासून अश्विनीचे वडील कचरू दाभाडे, आई शीलाबाई, मोठा भाऊ प्रकाश आकाश यांच्याबरोबर संदीपचे वाद सुरू होते. संदीपवर दुसरे लग्न केल्याचा या सर्वांचा संशय होता. त्यांच्यात नेहमी वाद होत. यासंदर्भात आत्महत्या करण्याच्या एक दिवस आधी स्वत: संदीपने पोलिसांत दिलेल्या तक्रारीतही तसे नमूद केले आले आहे.
काय आहेत घरच्यांचे आरोप
सासू-सासऱ्यांनी मारहाण करून संदीपचा सातत्याने मानसिक छळ केल्यानेच त्याने हे पाऊल उचलल्याचा आरोप संदीपच्या घरच्यांनी केला आहे. मृत्यूपूर्वी सासरकडच्यांनी संदीपला त्याच्या आईला घरी येऊन मारहाण केली होती.
नेमके काय घडले त्या रात्री
२२ मे २०१७ रोजी दुपारी संदीपच्या मेहुणा सासूने त्याचा प्रचंड अपमान केला. संदीप दुकानातील काम आटोपून रात्री ११ च्या सुमारास घरी आला. तेव्हा त्यांची प्रकृती खराब असल्याचे आईच्या लक्षात आले. त्याबाबत विचारताच तो ढसाढसा रडायला लागला. आपला खूप अपमान केला जात असल्याचे त्याने आईला सांगितले. संदीपच्या आईने त्याची सासू शीलाबाई यांना फोन करून याबाबत जाब विचारला. तेव्हा सासू शीलाबाई त्याचा मोठा मेहुणा प्रकाश संदीपच्या घरी गेले. या वेळी चांगलीच शाब्दिक चकमक उडाल्यानंतर प्रकाश शीलाबाई यांनी संदीप त्याच्या आईला मारहाण केली. लोक जमण्यास सुरुवात होताच दोघांनी तेथून काढता पाय घेतला. आधी अपमान आणि आता थेट मारहाणीने खचलेल्या संदीपने थेट सातारा पोलिस ठाणे गाठले सर्व हकिगत सांगितली. पोलिसांनी रात्री १२.३० वाजता संदीपची फिर्याद घेऊन शीलाबाई प्रकाश या दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा (एनसी) दाखल केला.
काय घडले दुसऱ्या दिवशी?
संदीप दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे आपल्या दुकानात गेला. शक्य होईल तितके पैसे जमवले आणि घरी परतला. स्वत:ला संपवण्याचा पूर्ण मानस संदीपने केला होता. आपल्या मृत्यूनंतर ज्या काही अपेक्षा होत्या त्याने आपल्या माळी नावाच्या एका मित्राकडे व्यक्त केल्या. त्याने मित्र पत्नीला फोन करून मी आता हे शेवटचेच बोलत असल्याचे सांगितले. मित्राने त्याला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पत्नीनेही समजावले. मात्र, फोन ठेवून पुढच्या २० मिनिटांतच त्याने गळफास घेतला.
मुलीशी बोलणे झालच नाही
पत्नी अश्विनीला केलेल्या कॉलवर त्याने मुलीशी बोलण्याची वारंवार इच्छा व्यक्त केली होती. पण मुलीशी बोलणे झालेच नाही. मग संदीपने तिसरा कॉल माळी या मित्राला १२. ५५ ला पुन्हा केला. मित्राला अखेरपर्यंत मुलीशी बोलायचे आहे एवढेच तो सांगत होता. माझ्याकडे वेळ कमी आहे, असे तो बोलत होता. मुलगी समृद्धीसोबत बोलण्याची त्याची इच्छा अपूर्णच राहिली.
...आणि गळफास घेतला
संदीपच्या फोननंतर तो आत्महत्या करत असल्याची माहिती त्याची पत्नी अश्विनीने सासूला फोन करून सांगितली. ते तत्काळ रिक्षात बसून घरी आले. मात्र तोपर्यंत बराच उशीर झालेला होता. घराचा दरवाजा तोडल्यानंतर समोर संदीप फासावर लटकलेल्या अवस्थेत होता. आईने तत्काळ दोरी कापून त्याला सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती.

पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
संदीपच्या मृत्यूचे खरे कारण समोर येऊ नये, म्हणून त्याच्या मोबाइलमधील सर्व कॉल डिटेल्स डिलिट करण्यात आले. २३ मे रोजी झालेले सर्व संभाषणाचे कॉल देखील डिलिट करण्यात आले. पोलिसांनी तपास केल्यानंतर मोबाइलसह संदीपच्या जप्त केलेल्या सर्व वस्तू त्याच्या घरच्यांना परत दिल्या.
असे आले सत्य समोर
संदीपकडील मोबाइल हा अॅडव्हॉन्स टेक्नॉलॉजीचा होता. संदीप जेव्हा आत्महत्या करण्यापूर्वी संभाषण करत होता तेव्हा त्याचे संपूर्ण कॉल हे रॅकॉर्ड होत होते. ही बाब संदीपला ही माहिती होती. त्याने स्वत; फोनवर बोलताना आपल्या मित्राला हे सांगितले होते. सासू, सासरे मेहुणे माझ्या मृत्यूला कारणीभूत आहेत. त्याचे हे पुरावे घ्या आणि मला न्याय द्या, असे देखील तो सांगत होता. याची कुणकुण लागल्यानंतर या मोबाइलमधील सर्व कॉल डिटेल रेकॉर्डिंग डिलिट करण्यात आली होती. मात्र, जेव्हा संदीपचा भाऊ नितीन याने मोबाइल तपासला तेव्हा मोबाइलच्या फाइल मॅनेजरमध्ये संदीपचे सर्व कॉल रेकॉर्ड जसेच्या तसे सुरक्षित निघाले.
पोलिसांची टाळाटाळ
संदीपला आईसमोर त्या रात्री मारहाण झाली होती. शिवाय त्या रात्री दोघांनी जाऊन पोलिसांत तक्रार केली होती. सासू शीलाबाई, कचरू दाभाडे, प्रकाश आकाश हेच माझ्या मुलाच्या मृत्यूला कारणीभूत अाहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून चौकशी करण्याची मागणी त्याच्या आईने केली आहे. मात्र, पोलिसांनी तपास सुरू आहे. नंतर बघू असे दिले. त्याला आता महिना उलटला तरी गुन्हे दाखल झालेले नाहीत.
- थेट सवाल
- भारत काकडे (पोलिस निरीक्षक, सातारा)
२३ मे रोजी संदीप नावाच्या तरुणाने आत्महत्या केली...
- होय, यासंदर्भात चौकशी सुरू आहे.
संदीपने सासुरवाडीच्या लोकांनी छळ केल्यानेच कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप आहे...
- तसा आरोप असल्यास फिर्यादींनी तक्रार करावी. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आम्हाला कुठलीच अडचण नाही, परंतु आम्हाला केवळ भेटून गुन्हे दाखल करा असे संबंधित लोक सांगत आहेत. त्यांच्याकडे असलेले पुरावे मात्र देण्यास ते टाळाटाळ करत आहेत. त्यामुळेच याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यास अडचणी निर्माण होत आहे.
पण जप्त केलेल्या मोबाइलमध्ये त्याचे पुरावे म्हणजे कॉल रेकॉर्डिंग असताना पोलिसांनी ते तपासले नाही का?
- मुळात संदीपने कोणतीही सुसाइड नोट लिहिली नव्हती. सुरुवातीला याप्रकरणी कुणीही तक्रार केली नाही. त्यामुळे रीतसर पंचानामा करून त्यांच्या पत्नीला आम्ही सर्व वस्तू परत केल्या आहेत. नंतर त्यात ते रेकॉर्डिंग असल्याचे सांगत आहेत. ही रेकॉर्डिंग आमच्या ताब्यात देण्यात आलेली नाही. दिल्यास आम्ही तपास करू गुन्हे दाखल करू. ते लोक आमच्याकडे येत नाहीत, त्याला आम्ही काहीही करू शकत नाही.

त्यांनी शब्द पूर्ण केला
माझे पती माझ्यासोबत सातत्याने भांडण करत होते. डोक्यावरील कर्ज कमी करण्यासाठी मला सातत्याने सांगत होते. तुझ्या घरून पैशांची व्यवस्था कर, असे ते सातत्याने सांगत. जर पैसे आणले नाही तर आत्महत्या करून घरच्यांना पोलिसांत देईन अशी धमकी देत होते. याविरुद्ध मी तक्रारदेखील केली होती. अखेर त्यांनी त्यांचा शब्द पूर्ण केला. आम्हाला याचा नाहक त्रास होत आहे.- अश्विनी अंभोरे, संदीपची पत्नी
-रात्री जेव्हा संदीपला खूप ताप आला होता. त्याला काय झाले असे विचारताच तो खूप जोरजोरात रडायला लागला. माझा खूप अपमान झाला असे तो सांगत होता. मी त्यांच्या सासुला विचारणा केली तेव्हा त्यांनी प्रकरणाचा खुलासा केला तर नाही. मात्र ,त्या रात्री मुलाला मारले. त्यांच्यासमोर मलाही मारले. हा अपमान तो पचवू शकला नाही. मी माझ्या मुलाला वाचवू शकले नाही. मी दुपारी त्याच्याजवळ थांबायला हवे होते. - शीलाबाई अंभोंरे, सदीपची आई
मी त्या दिवशी मुंबईत होतो
- बहिणीला घरातून काढून दिल्याने त्या दिवशी आई आणि भाऊ संदीप यांना केवळ समजावण्यासाठी गेले होते. त्यांनी आत्महत्या का केली याची आम्हाला काही माहिती नाही. मी त्या दिवशी मुंबईला होतो. -प्रकाश दाभाडे, संदीपचा मेहुणा
मी खूप समजावले
- संदीपने आत्महत्या करण्यापूर्वी मला कॉल केले होते. मी त्याला सातत्याने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने काही ऐकले नाही. त्याने आत्महत्या का केली याचा रेकॉर्ड संदीपच्या मोबाइलमध्ये आहे. -मच्छींद्र माळी, संदीपचा जीवलग मित्र
- संदीपने मृत्यूपूर्वी केलेले तीन मोबाइल कॉलचे रेकॉर्ड डीबी स्टारच्या हाती लागले आहेत. संदीपने पहिला कॉल दुपारी १२.४६ वाजता आपला जवळचा मित्र मच्छिंद्र माळी याला केला होता. यात संदीपने आपण हे शेवटचे बोलत आहोत. नीट लक्ष देऊन ऐका, माझ्यानंतर मुलांचा सांभाळ योग्य रीतीने करा. मला त्रास देणाऱ्या सासू, सासरे आणि दोन्ही मेहुण्यांना शिक्षा करा. मी जे आता बोलतो आहे हाच पुरावा समजा. रात्री पोलिसांत केलेली तक्रार आणि हे फोन रेकॉर्ड पोलिसांना दाखवून मला न्याय द्या, असा टाहो त्याने या पहिल्या कॉलमध्ये फोडला आहे.
त्यानंतर त्याने दुसरा कॉल १२.५० वाजता पत्नी अश्विनीला केला. माझ्यानंतर आपल्या मुलांना रस्त्यावर येऊ देऊ नको, मी त्यांच्यासाठी भरपूर पैशांची व्यवस्था केली आहे, असे सांगत त्याने हा कॉल कट केला.
पोलिसांनी या प्रश्नांची उत्तरे शोधवीत
- संदीप त्याच्या आईसोबत संदीपच्या सासुरवाडीकडच्यांनी ज्या दिवशी त्याच्या घरी येऊन भांडण केले त्या दिवशी आवाजाने शेजारीपाजारीही आले असतील. त्यांच्याकडूनही माहिती घेता येऊ शकते.

- संदीपच्या मोबाइलमधील कॉल रेकॉर्ड कुणी डिलिट केले याचाही तपास व्हावा. पोलिसांनी घटना घडली त्या दिवशी इतर सर्व वस्तूंसह मोबाइलही जप्त केला होता. त्यामुळे सारे पुरावे मिटवण्यात पोलिसांतीलच कुणी आहे का, हेही तपासले जावे.

- ज्या मित्राला संदीपने मृत्यूपूर्वी फोन केले होते त्याच्याकडूनही माहिती मिळू शकते.

- संदीपच्या पत्नीशी मुलाशी बोलावे. त्यातूनही काही धागेदोरे हाती लागू शकतात.
पुढे स्लाइडवर त्या ऑडियो संभाषणाची क्लिप आणि मोबाईलवरून डिलीट केलेलाकॉल लॉग...

Next Article

Recommended