आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवक महोत्सवात पुन्हा लागणार लावणीचा ठेका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डिसेंबर महिन्यात युवकांच्या तारुण्याचा उत्साह वाढविणारा युवक महोत्सव होत असून काही वर्षांपूर्वी बंद केलेली सर्वांची लोकप्रिय अशी लावणी या कला प्रकाराचा या वर्षी पुन्हा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे लोककलेतील सर्वांत आवडत्या प्रकाराला पुन्हा एकदा व्यासपीठ मिळाले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने डिसेंबर महिन्यात १३ ते १६ डिसेंबर दरम्यान युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यंदा हा सोहळा विद्यापीठात होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे आहे. हा उत्साह आता आणखी द्विगुणित होणार आहे. कारण कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी या महोत्सवापासून पुन्हा एकदा लावणी या कला प्रकाराचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या चार, पाच वर्षांपासून लावणी बंद करण्यात आली होती.

बीड आणि औरंगाबाद येथील एका महाविद्यालयात युवक महोत्सवादरम्यानच लावणी सुरू असताना गोंधळ उडाला होता. स्टेजवर येऊन अप्रिय प्रकार बीडमध्ये घडला होता. यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुन्हा असे प्रकार घडू नयेत. यासाठी लावणीच महोत्सवातून रद्द करण्यात आली होती. यामुळे या कला प्रकारात माहीर असणाऱ्या विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला होता. मात्र, आता पुन्हा लावणी हाेणार असल्याने सर्वच स्तरातून या निर्णयाचे स्वागत होत आहे.
महाविद्यालय स्तरावरच युवक महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या पारंपरिक कला प्रकारांना नवी चालना देण्यास मदत मिळते. असे प्रकार सर्वांसमोर यायला हवे. लावणीकडे केवळ कला आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून पाहिल्यास या कलेलाही चांगले दिवस येतील, असेही जाणकारांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राची ओळख
लावणी पूर्वीही युवक महोत्सवात होती, परंतु मध्यंतरीच्या काळात ती बंद करण्यात आली. खरं तर ती महाराष्ट्राची ओळख आहे. पाश्चात्त्य कपड्यातील कला तुम्ही स्वीकारता पण पूर्ण कपड्यातील लावणी का नाही? लावणी या कलेचा चुकीच्या पद्धतीने प्रचार झाला. हा चांगला कला प्रकार असून तो इतर कलांमधून बाजूला का ठेवायचा. लावणी पुन्हा सुरू करणे योग्यच होईल.
प्रा. दिलीप महालिंगे
लोककलेचे जतन
लावणी हा अतिशय लोकप्रिय प्रकार आहे, परंतु या प्रकाराला टिकवून ठेवण्यासाठी आतापर्यंत केवळ शासनस्तरावर आश्वासनच मिळाले आहे. त्या कलेला जतन करण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नाही. विद्यापीठ स्तरावर या कलेला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न केले तर लावणीला चांगले दिवस येतील. या निर्णयाचे स्वागतच आहे.
प्रा. अशोक बंडगर, प्राध्यापक, नाट्यशास्त्र विभाग, विद्यापीठ.