आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वंचित मुलांच्या "ब्राइट फ्युचर'साठी तरुणांचा मदतीचा हात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना ग्रुपचे निशाद माने इतर - Divya Marathi
मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना ग्रुपचे निशाद माने इतर
बीड - दारिद्र्याचा वारसा पुढच्या पिढीला द्यायचा नसेल, तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, समाजातील वंचित, गरीब कुटुंबाच्या परिस्थिती सुधारणा होण्यासाठी त्यांच्या मुलांनी शिकलं पाहिजे, कुटुंबातील एक जण शिकला तर एक पिढीच बदलते. याच उद्देशाने त्यांनी वंचित मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी काम सुरू केलं आणि चार वर्षांमध्ये हजारांवर मुलांना प्रोत्साहित करत त्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्याचे काम बीड शहरातील तरुणांच्या एका ग्रुपने केले आहे.

याबाबत सांगताना ग्रुपचे सदस्य निशाद माने म्हणतात, सावरकर विद्यालयातील सन २००१ च्या दहावीच्या बॅचचे आम्ही आठ जण मित्र. व्यवसाय- नोकरीच्या निमित्ताने कुणी शहरात, तर कुणी शहराबाहेर काम करतात. २०१२ मध्ये आम्ही असेच एकत्र आलो आणि शिक्षणासाठी काम करण्याचं ठरवलं, ज्या मुलांना केवळ शैक्षणिक साहित्याचा खर्च लागतो म्हणून पालक शाळेत पाठवत नाहीत असे मजूर, कामगार यांच्या भागातल्या शाळा आम्ही शोधून काढल्या आणि या मुलांनी शिकलं तरच यांची स्थिती सुधारू शकेल यासाठी मदत म्हणून त्यांना वर्षभर पुरेल इतकं शैक्षणिक देण्याचा निर्णय घेतला. हे करत असताना जिल्हा परिषदेची अशोकनगर भागातली शाळा आम्ही निवडली.

पुस्तके आणि गणवेश शासनाकडूनच मिळत असल्याने हा प्रश्न मिटला हाेता. राहिला प्रश्न दप्तर, वह्या, पुस्तक, पेन, पेन्सिल यांचा, या छोट्या खर्चासाठीही पालकांकडून नकार मिळतो, शाळेपेक्षा मुलगा काही तरी काम करून दोन पैसे कमवतो का, याकडेच पालकांचा कल असतो. यामुळे मुलांना शाळेत पाठवण्याबाबत अनुत्साह असतो. ही बाब लक्षात घेऊन २०१३ मध्ये पहिल्यांदा आम्ही या शाळेतील विद्यार्थी दत्तक घेत त्यांना साहित्य पुरवले. चार वर्षांमध्ये हा आकडा आता तीन शाळा आणि एक हजार १८३ विद्यार्थी इतका झाला आहे. शनिवारी मान्यवरांच्या हस्ते अशोकनगर, नाळवंडी नाका आणि शहीद भगतसिंग विद्यालयातील विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. या वेळी ग्रुप सदस्य राहुल कागदे, सुनील कुटे, भागवत कव्हाळे, सचिन डहाळे, विशाल लोढा, संतोष नवादे, आदित्य खोपटीकर, अभय चिंचोलकर यांची उपस्थिती होती.


ज्यांची बाग फुलून आली
सुरुवातीलाकाम सुरू केल्यानंतर आम्ही आठ जणांनी पैसे जमा करून खर्च केला. आता हळूहळू इतर लोक, मित्र या उपक्रमाला जोडत आहेत. प्रत्येक वर्षी आम्हालाही मदतीचा हात मिळत असल्याने जास्तीत जास्त मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सदस्यांनी सांगितले.

तरुणांसाठी काम
सध्याआमच्या ग्रुपची नोंदणी नाही, पण लवकरच आम्ही एज्युकेशन फॉर ब्राइट फ्युचर या नावाने नोंदणी करणार आहोत. येत्या काळात तरुणांसाठी काम सुरू करण्यात येणार असून गावागावात वाचनालय सुरू करण्याचे प्रयत्न असतील.’’ निशादमाने, ग्रुप सदस्य

पालकांशी संवाद
केवळमुलांना मदत करूनच हा ग्रुप थांबला नाही, तर मुलांना कशा पद्धतीच्या शिक्षणाची गरज आहे हे ओळखून शिक्षकांनाही शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले. पालकांच्या सभा, मेळावे घेत मुलांना शिक्षणासाठी पाठवण्याचे समुपदेशन केले. याचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. मुलांना आनंददायी शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनाही साहित्य दिले.