औरंगाबाद - मुकुंदवाडी परिसरातील राजनगरमध्ये १९ वर्षीय तरुण व्यावसायिकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून झाल्याची घटना रविवारी पहाटे उघडकीस आली. मनोज अशोक गवळी असे मृत तरुणाचे नाव असून तो मिनरल वॉटर जार विक्रीचा व्यवसाय करत होता.
शनिवारी मनोजची आई कामानिमित्त वसईला गेली होती. वडील सुरक्षा रक्षक असल्याने रात्रपाळीला गेले होते. रविवारी सकाळी साडेअाठच्या दरम्यान ते कामावरून घरी परतले तेव्हा दार आतून लावले होते. दरवाजा ठोठावूनही आतून प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून त्यांनी मोठ्याने आवाज दिले, तरीही प्रतिसाद मिळाल्याने त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला. दरवाजा तोडताच समोर पलंगावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मनोजचा मृतदेह दिसला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे, सहायक पोलिस आयुक्त रविकांत बुवा, निरीक्षक नाथा जाधव यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनास्थळी श्वान पथक ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक एस. ए. गिते करत आहेत.
खुनाचे कारण अस्पष्टच : मनोजच्या खुनाचे कारण स्पष्ट झाले नाही. काही महिन्यांपूर्वी त्याने स्वत:चा मिनरल वॉटर जार विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. दुचाकीवर तो सिडको एन-३, एन-४, मुकुंदवाडी परिसरात जार पुरवत होता. या व्यवसायात यश मिळाल्याने तो रिक्षा विकत घेणार होता, अशी माहिती स्थानिकांनी दिली. मनोज चांगल्या स्वभावाचा होता. त्याला कुठलेच व्यसन नव्हते, असे त्याच्या मित्रांनी सांगितले. त्याला एक विवाहित बहीण आहे. त्याचे कुणाशीही वैर नव्हते. त्यामुळे त्याचा खून कसा झाला, असा प्रश्न मित्रांना पडला आहे.
आधीवाद, नंतर खून : शनिवारीरात्री मनोजच्या ओळखीच्या दोन ते तीन व्यक्ती घरात आल्या असाव्यात. कुठल्या तरी कारणावरून त्यांच्यात वाद होऊन त्याचे रूपांतर भांडणात होऊन घराबाहेर पडलेला मोठा दगड त्यांनी मनोजच्या डोक्यात घातला. त्या अगोदर टी-शर्टने त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. हा प्रकार कुणाला समजू नये, म्हणून आरोपींनी मनोजच्या तोंडात बोळा कोंबला होता. समोरच्या दरवाजाची कडी उघडता आरोपी जिन्याच्या मार्गाने गच्चीवरून उडी मारून पसार झाले असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे.
चिठ्ठी सापडली
पोलिसांनी घराची झडती घेतली असता एक चिठ्ठी सापडली. त्यावर, मी काळतोंडा आहे. मला जगायचा कंटाळा आल आहे, असे आईवडिलांना उद्देशून लिहिले. काही मित्रांची नावे लिहून स्वत:ला संपवत असल्याचे सांगत त्यांची माफी मागितल्याचा मजकूरही आहे. कपाट अस्ताव्यस्त केले होते. त्याने घटनेच्या अगोदर कोणाशी संपर्क साधला का, त्याचे व्यावसायिक हेवेदावे होते का, आदींचा तपास पोलिस करत आहेत.
पुढे वाचा... तरुणाने घेतला गळफास