आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवा सेनेत लवकरच सर्व नवीन चेहरे, २८ वर्षे वयाची अट निश्चित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद; अंतर्गत वादामुळे स्थगित करण्यात आलेली युवा सेनेची कार्यकारिणी पुढील महिन्यात नव्याने गठीत केली जाण्याचे संकेत आहेत. आदित्य ठाकरे डिसेंबर महिन्यात शहराच्या दौऱ्यावर येत असून त्यात नव्या कार्यकारिणीवर शिक्कामोर्तब होऊ शकते. त्यामुळे कोणाला संधी मिळणार अन् कोणाला डावलले जाणार, याकडे आतापासूनच युवा कार्यकर्त्यांचे लक्ष लागले असून अनेकांनी फिल्डिंगही लावली आहे.

गेल्या वर्षभरापासून युवा सेनेच्या कार्यकारिणीला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा तसेच तालुका युवा अधिकारी सध्या फक्त नावालाच आहेत. युवा सेना गठीत झाल्यानंतरही ही पहिलीच कार्यकारिणी होती. अंतर्गत वाद वाढल्यामुळे तसेच नवीन पदाधिकारी नियुक्त करण्यात येणार असल्याचे कारण पुढे करून या कार्यकारिणीला स्थगिती देण्यात आली होती. लवकरच नवीन पदाधिकारी येतील, असे तेव्हाच सांगण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात अजूनही तसे झाले नाही.

गेल्या काही महिन्यांपासून आदित्य मराठवाड्यात खासकरून औरंगाबाद जिल्ह्यात सक्रिय झाले आहेत. त्यांनी नुकतेच जिल्ह्याचे दोन दौरे केले, त्याचबरोबर डिसेंबरमध्ये शहराचा आणखी एक दौरा करण्याचे जाहीर केले. या दौऱ्यात आदित्य हे पालिकेच्या कारभाराचा आढावा घेणार आहेत. तेव्हाच युवा सेनेच्या नवीन कार्यकारिणीचाही निर्णय होऊ शकतो, असे सूत्रांनी म्हटले आहे.

अठ्ठाविसीनंतरच्यांना संधी नाहीच
युवासेनेचा कार्यकर्ता तसेच पदाधिकारी होण्यासाठी पक्षाने २८ वर्षे वय ही प्राथमिक अट निश्चित केली आहे. त्यामुळे मावळत्या पदाधिकाऱ्यांतील अनेक जण आपोआपच यातून बाहेर पडतील. त्यातील काहींच्या अन्य पदांवर नियुक्त्या झाल्याने त्यांना युवकांच्या या सेनेत आता संधी मिळणार नाही. जे कोणी शिल्लक आहेत, त्यांच्याकडे अन्य पदे देऊन मुख्य पदे ही नव्या चेहऱ्यांकडे दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे युवा कार्यकर्त्यांचे लक्ष आता आदित्य ठाकरे यांच्या पुढील महिन्याच्या दौऱ्याकडे लागले आहे.