आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौरपदासाठी युतीकडून बंडखोरांना स्थायी समिती सभापती, शासकीय समित्यांचे गाजर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबादच्या महापौरपदासाठी युतीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यासाठी बंडखोरांना स्थायी समितीच्या सभापतिपदाची ऑफर दिली जात आहे. त्यावरही समाधान होत नसेल तर शासकीय समितीवर कुटुंबीयांची वर्णीही लावण्याचे आमिष दिले जात आहे.

मनपा निवडणुकीत युतीच्या स्थानिक नेत्यांनी बंडखोरांना वेळीच आवर घातला नाही. उलट काही जणांना खुलेआम रसदही पुरवली. युतीला काठावर बहुमत मिळेल. आणि मग स्वत:चे पक्षातील महत्त्व वाढवण्यासाठी बंडखोरांचा वापर करता येईल, असे त्यांचे आडाखे होते. ते साफ चुकले.

युतीला केवळ ५० जागा मिळाल्या. परिणामी बंडखोरांचे महत्त्व प्रचंड वाढले आहे. पालकमंत्री रामदास कदम, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्वत: काही बंडखोरांशी थेट संपर्क साधला. शिवाय हे बंडखोर ज्या स्थानिक नेत्यांच्या जवळचे आहेत. त्यांच्यावरच तुमचे बंडखोर तुम्ही परत पक्षासोबत आणा, असे बजावले आहे. त्यानुसार जोरदार हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. १८ पैकी दहा बंडखोर युतीच्या जवळचे आहेत.

त्यांच्या वॉर्डातील सामाजिक समीकरणेही हिंदुत्ववादाशी नाते सांगणारी आहेत. त्याचा वापर करण्याचा पहिला प्रयत्न नेत्यांकडून झाला. त्याला फारशी दाद मिळाली नाही. उमेदवारी न मिळाल्याने आमचे मोठे नुकसान झाले. खर्चही वाढला. तो कसा भरून काढायचा, असा बंडखोरांचा सवाल होता.

काहींनी तर मोठे पद मिळाले तरच पाच वर्षे सोबत राहू, असे बजावले. त्यामुळे स्थायी समितीचे सभापतीपद, महिला बालकल्याणचे सभापतीपद, सलग दोन वर्षे स्थायी समितीचे सभापतीपद, एक वर्ष वॉर्ड सभापतीपद अशा ऑफर्स देण्यात आल्या आहेत.

दोन बंडखोरांनी केवळ मनपातील पदांवर समाधान होणार नसल्याचे सांगितल्यावर त्यांच्या कुटुंबियांना शासकीय समितीवर सदस्यपद देण्याची तयारीही दाखवण्यात आल्याचे सूत्रांनी सांिगतले.