आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Zestfulness In Electronic And Vehicle Market On The Occasion Of Dashera

ग्राहकांचे सीमोल्लंघन; खरेदीचा सुकाळ, सोन्याची विक्री 80 टक्के जास्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जागतिक मंदी आणि मराठवाड्यात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे मागील वर्षी सर्वच सण, महोत्सवांतील खरेदीला कात्री लागली होती. यंदा भरपूर आणि सतत पडलेला पाऊस, आनंदाने डोलणारी पिके , उद्योग जगतात खुळखुळणार्‍या पैशामुळे विजयादशमीला ग्राहकांनी मनमुराद खरेदी केली. सोने मागील वर्षातील विक्रीच्या तुलनेत 80 टक्के जास्त विकले गेले, तर इतर गृहोपयोगी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या आजच्या विक्रीने वर्षभरातील तूट एकाच दिवसात भरून काढली. आज शहरात सर्वत्र आनंद, उत्साह आणि चैतन्य जाणवत होते.

साडेतीन मुहूर्तातील एक असलेल्या दसर्‍यानिमित्त सोने, घर, गाडी, घरगुती वस्तू आणि कपड्यांची खरेदी मोठय़ा प्रमाणात झाली. सकाळपासून पिवळी, केशरी रंगांची झेंडूची फुले लक्ष वेधत होती. कर्णपुरा तसेच शहरातील सर्वच देवीच्या मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी भक्त गर्दी करत होते. नवे कपडे परिधान करून पुरुष, बच्चे कंपनी, तर भरजरी साड्या नेसून महिला आप्तेष्टांच्या भेटीगाठी घेण्यात दंग होत्या. सायंकाळी रावणदहनाचा सोहळा अनेकांनी पाहिला आणि दसरा उत्साहात साजरा झाला.

पहाटे पाच वाजेपासूनच घराघरांसमोर साफसफाई आणि सडा, रांगोळी काढणे सुरू होते. ठिकठिकाणी सुंदर, सुबक, रांगोळ्या दिसत होत्या. अनेकजण दुचाकी, चारचाकी धुऊन त्यांना फुलांच्या माळा चढवत होते. या सणाला कोट्यवधींची उलाढाल झाली. अद्ययावत आणि नव्या गॅझेटच्या खरेदीप्रमाणेच सोन्यामध्येही दीड कोटींपेक्षा जास्त उलाढाल झाली. चारचाकी आणि दुचाकींची खरेदीही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चांगली झाल्याचे शोरूम मालकांनी सांगितले. अनेक ठिकाणी सुवासिनींना जेवणासाठी आमंत्रित करण्यात आले होते. खणा-नारळाची ओटी भरून सुखसमृद्धी अशीच तेवत राहू दे, असा मानस मनामनातून व्यक्त झाला. नव्याने खरेदी केलेल्या वस्तूंचे औक्षण करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शुभमुहूर्तावर अनेकांनी गृहप्रवेश केला.